esakal | दोन महिन्यांत चौपदरीकरण पूर्णत्वास ः राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-goa highway work statement MP Vinayak Raut

शहरातील उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाखालून जाणारा सेवा रस्ता दर्जेदार बनवला जाणार आहे. या सेवारस्त्याची रूंदी वाढविण्यासाठी लगतची अनधिकृत बांधकामे देखील हटवली जातील.

दोन महिन्यांत चौपदरीकरण पूर्णत्वास ः राऊत

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम 95 टक्‍के पेक्षा अधिक पूर्ण झालंय. फक्‍त तळेरे, कासार्डे, नांदगाव आणि कणकवलीतील उड्डाणपूल पूर्ण व्हायचा आहे. तो देखील दोन महिन्यात पूर्ण होतील आणि खारेपाटण ते झाराप चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज दिली. 

शहरातील उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाखालून जाणारा सेवा रस्ता दर्जेदार बनवला जाणार आहे. या सेवारस्त्याची रूंदी वाढविण्यासाठी लगतची अनधिकृत बांधकामे देखील हटवली जातील. त्यामुळे उड्डाणपुला इतकाच दर्जा सेवा रस्त्याचा राहील आणि कणकवली शहराचे महत्व देखील कमी होणार नाही असेही श्री. राऊत म्हणाले. 

महामार्ग चौपदरीकरणात रखडलेली कामे, प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खासदार राऊत यांनी आज खारेपाटण ते झाराप, असा दौरा केला. त्यांनतर या दौऱ्याबाबतची माहिती त्यांनी विजयभवन येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, राजू राठोड, सुजित जाधव, ऍड. हर्षद गावडे, सचिन सावंत, प्रसाद अंधारी, विलास कोरगावकर, रामू विखाळे, राजन म्हाडगूत, अरुण परब आदी उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, ""महामार्ग चौपदरीकरण आढावा तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही खारेपाटण ते झाराप या दरम्यान महामार्गाची पाहणी केली. यात तळेरे, कासार्डे, नांदगाव आणि कणकवली शहरातील उड्डाणपुलांची कामे वगळता उर्वरित चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात कासार्डे, नांदगांव पुलांची कामे पुढील 15 दिवसांत पूर्ण होतील. तळेरे बाजारपेठेतील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांत मार्गी लागेल. तर कणकवली शहरातील उड्डाणपूल तयार झाला आहे. उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्‍सवेल भिंतीच्या दुरुस्तीबाबत केंद्रीय स्तरावरून मार्गदर्शन मागवले आहे. ते येताच कणकवली शहरातील उड्डाणपूल देखील वाहतुकीस सुरू केला जाणार आहे.'' 

शहरातील उड्डाणपुलाखाली दोन ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. त्याअनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करत आहोत. उड्डाणपुलाखाली स्वच्छतागृहे बांधणे शक्‍य नसल्यास महामार्गालगत असणारी नगरपंचायतीची जागा देण्याबाबत नगरपंचायतीला विनंती करणार आहोत. ही जागा उपलब्ध होताच सीएसआर फंडातून स्वच्छतागृहांची उभारणी होणार असल्याचे राऊत म्हणाले. 

महामार्ग चौपदरीकरणात कणकवलीचे महत्व कमी होऊ देणार नाही. उड्डाणपुलाप्रमाणेच त्याखालील सेवा रस्ता प्रशस्त आणि दर्जेदार तयार केला जाणार आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होताच शहरातील महामार्ग दुतर्फा असणारी बांधकामे हटवली जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होईल आणि शहराचे महत्व देखील अबाधित राहणार असल्याचे श्री.राऊत म्हणाले. 

मिसिंग प्लॉटचे तातडीने ऍवॉर्ड 
नांदगाव, कासार्डे आणि वागदे भागात मिसिंग प्लॉट आहेत. या प्लॉटचे तातडीने ऍवॉर्ड करा आणि प्रकल्पबाधितांना मोबदला देण्याची कार्यवाही करा, असे निर्देश महसूल आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याबाबतची कार्यवाही देखील सुरू असल्याची माहिती खासदार श्री.राऊत यांनी दिली. 

गरजेच्या ठिकाणी सेवा रस्ते 
खारेपाटण ते झाराप या दरम्यान आवश्‍यक त्या सर्व ठिकाणी सेवा रस्ते प्रस्तावित आहेत. यात तातडीची आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी प्राधान्याने सेवा रस्ते तयार केले जात आहेत. तर उर्वरित ठिकाणच्या सेवा रस्त्यांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

loading image