esakal | Mumbai - Goa Highway : चौपदरीकरणाची कुर्मगती; आठ वर्षात आठ टक्के काम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai - Goa Highway : चौपदरीकरणाची कुर्मगतीः आठ वर्षात आठ टक्के काम

Mumbai - Goa Highway : चौपदरीकरणाची कुर्मगती; आठ वर्षात आठ टक्के काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेली आठ वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणवासीयांकडून चेष्टेचा, संतापाचा आणि शरमेचा विषय ठरला आहे. चौपदरीकरणाचा शुभारंभ होऊन आठ वर्षे झाली तेव्हापासून शुक्लकाष्ट कोकणवासीयांच्या मागे लागलेय. कोकणातील जनता संयमी आहे याचा अर्थ त्या संयमाचा अंत पाहायचा की, या रस्त्यावरून प्रवास करून त्यांच्या देहाचाच अंत व्हावा, म्हणून वाट पाहायची? नितीन गडकरी यांना शिवसेनाप्रमुखांनी 'रोडकरी' अशी उपाधी दिली. देशात त्यांच्या नावे अनेक विक्रम झाले. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम हा जागतिक विक्रम म्हणून वेगळ्या अर्थाने कायम चर्चिला जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आठवड्यात खड्डे भरण्यापूर्वी मंत्री गडकरी यानी मुंबईहून लांजापर्यंत कारने प्रवास करून हा गड एकदा सर करावा, अशी सूचना करणारा हा प्रस्तुत लेख.

-जे. डी. पराडकर, संगमेश्वर

चौपदरीकरणातील आरवली ते बावनदी हे काम करणाऱ्या कंपनीने आठ वर्षात आठ टक्के काम केले. याच कंपनीकडे पुढे लांजापर्यंत काम होते, त्या भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जी कंपनी काम करण्यास सक्षम नाही, तिला काम दिलेच कसे? नियमानुसार मिळाले तर कामात विलंब झाला, म्हणून कोणती कठोर कारवाई केली? या कंपनीच्या अकार्यक्षमपणामुळे कोकणवासीयांचे आणि वाहनचालकांचे हाल झाले, वाहनांचे गेली आठ वर्षे नुकसान झाले याला जबाबदार कोण? ज्या कंपनीकडे ९० कि.मी.चे काम देण्यात आले, त्या कंपनीच्या आडमुठेपणावर नियमावलीत, करारात काहीच तरतूद नव्हती? कारवाईची तरतूद असेल तर अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन ठेकेदार का नेमला नाही? या कंपनीमुळे या भागातील प्रकल्पाचा खर्च वाढला, तो पुढे जनतेला टोलच्या रूपाने भरावा लागणार आहे. मग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी यांची जबाबदारी काय?

२०१४ साली संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीवरील पुलाचे भूमिपूजन केले, त्या वेळी गडकरींनी केलेल्या भाषणात पुलाच्या पूर्ततेसह राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाबाबत जे विधान केले, त्याला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी अक्षरशः हरताळ फासला. सप्तलिंगी नदीवरील पूल आठ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. या पुलासह अन्य १२ पूल होते. विशेष म्हणजे गेल्या ८ वर्षात यातील एकाही पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रत्येक वेळी कंपनी बदलायची, त्यांनी पोट ठेकेदार नेमायचे, पैसे मिळत नाहीत, म्हणून त्यांनी काम अर्धवट टाकायचे आणि निघून जायचे. ब्रिटिशकालीन ८० वर्षांपूर्वीचे पूल आत्तासारखी यंत्रणा प्रगत नसताना तीन वर्षात उभारले गेले. गेल्या आठ वर्षात खड्ड्यांमुळे वाया जाणारे इंधन, पर्यटकांनी कोकणकडे फिरवलेली पाठ, वाहनांचे होणारे नुकसान, प्रवाशांचे-चालकांचे शारीरिक नुकसान, वेळ, मनस्ताप या साऱ्याला जनता तोंड देत आहे.

गडकरींनी लांजापर्यंत प्रवास करावा..

न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आठवड्यात खड्डे भरून होण्यापूर्वी गडकरींनी मुंबई-गोवा रोडवरून केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजापर्यंत प्रवास करावा. महामार्गाचे, पुलांचे काम विलंबाने होत आहे, याबाबत आंदोलन करायचे ठरवले. महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांबाबत आंदोलन करायचे ठरवले तर पोलिस ठिकठिकाणी कारवाईचे फलक लावून जनतेला आंदोलनाआधीच घाबरवून टाकतात. प्रत्येक लोकप्रतिनिधीचे ध्वज आणि हेतू निरनिराळे असल्याने गेली आठ वर्षे त्यांच्याकडून पाठपुरावा झाला नाही.

loading image
go to top