esakal | मुंबई पोलिसांची कामगिरी; ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी गजाआड

बोलून बातमी शोधा

Mumbai police arrested online fraud gang kokan crime marathi news

नवी मुंबई पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून दोन दिवस या टोळीचा माग काढला.

मुंबई पोलिसांची कामगिरी; ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी गजाआड
sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी छत्तीसगडमधील जामतारा येथूनच सर्वसामान्यांना गंडा घालते असे नाही, तर आता आणखी काही राज्यांतील लोकही आपल्या आजूबाजूला राहून ऑनलाइन फसवणूक करण्यात गुंतल्याचे लक्षात आले आहे. येथील एका इमारतीतून ऑनलाईन फसवणूक करणारी पश्‍चिम बंगालमधील टोळी गुरुवारी रात्री पकडण्यात आली आणि गंडा घालणारे आता आपल्या दरवाजापर्यंत पोचल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे ते सर्वजण येथे मासेविक्रीतही सहभागी होते. 

नवी मुंबई पोलिसांनी येथील पोलिसांच्या साह्याने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. शहरातील एका इमारतीमध्ये गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. टोळीतील सौरभ विश्‍वनाथ मंडल (वय 28), पार्थ प्रतीम बोस (33), जॉय शंकर दीपक सरकार (23), आलोक भूपेंद्र बर्मन (सर्व रा. हावडा, पश्‍चिम बंगाल) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील सर्व साहित्यही जप्त केले. 

या बाबत येथील पोलिसांनी दिलेलेली माहिती अशी : ऑनलाईन फसवणुकीबाबत नवी मुंबई येथील तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली होती. त्याचा पोलिस तपास करीत होते. तुर्भेचे सहायक पोलिस निरीक्षक पी. के. सिव्हूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले पथक गेले दोन दिवस मोबाईल लोकेशनद्वारे दोडामार्ग शहरात माग काढत होते. गुरुवारी तपास सुरू असताना प्रथम गोवा हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ लोकेशन मिळाले. त्यानंतर एसटी बस स्टॅण्डजवळ लोकेशन मिळाले आणि तेथील एका इमारतीत टोळी असल्याचे स्पष्ट झाले. त्या इमारतीत अनेक कुटुंबे राहत असल्याने ती टोळी नेमक्‍या कोणत्या फ्लॅटमध्ये राहत असावी, याचा पोलिसांना शोध घेण्यास अडचण येत होती; मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने अत्यंत शिताफीने एका खोलीवर छापा टाकला असता त्या खोलीत चार युवक, त्यांच्याकडे महागडे व साधे असे पंधरा मोबाईल, चेक व पासबुक, एक लॅपटॉप व एक टॅब (फोन) असे साहित्य मिळाले. पोलिसांनी पंचनामा करून चारही युवकांना साहित्यासह पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पंचनामा करून त्यांना ताब्यात घेत रात्री अकरा वाजता तपासासाठी आलेले पथक नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 

चारही युवक गेल्या अनेक महिन्यांपासून भाडेतत्त्वावर इमारतीत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी खोली बदलली होती. त्यांचा वावर संशयास्पद होता. ते बॅंक ग्राहकांना मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांच्या खात्यातील रक्कम काढत होते. त्यांचा तो दैनंदिन कामकाजाचा भाग होता; मात्र मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोडामार्ग पोलिसांच्या मदतीने त्यांचा डाव उधळून लावत त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. 

दोडामार्ग पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील पोलिस नाईक अनिल पाटील, कॉन्स्टेबल स्वप्नील पांगम यांचा यांनी नवी मुंबई पोलिसांना साह्य केले. 

संपादन : विजय वेदपाठक