हायअलर्टमुळे मुंबई - रायगडच्या 250 नौका जयगड बंदराच्या आश्रयाला

राजेश शेळके
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - मासेमारी बंदी उठल्यानंतर अतिवृष्टी आणि वादळी वार्‍याची तमा न बाळगता समुद्रात गेलेल्या रायगड आणि मुबंईच्या मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. समुद्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेसाठी 250 नौकांनी जयगड बंदराचा आश्रय घेतला आहे. रविवार 11 पर्यंत हायअलर्ट असल्याने आणखी दोन दिवस या नौका बंदरात उभ्या राहणार आहेत. मात्र स्थानिक मच्छीमारांनी याला विरोध केल्याने काहीसे तणावाचे वातावरण आहे.

रत्नागिरी - मासेमारी बंदी उठल्यानंतर अतिवृष्टी आणि वादळी वार्‍याची तमा न बाळगता समुद्रात गेलेल्या रायगड आणि मुबंईच्या मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. समुद्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेसाठी 250 नौकांनी जयगड बंदराचा आश्रय घेतला आहे. रविवार 11 पर्यंत हायअलर्ट असल्याने आणखी दोन दिवस या नौका बंदरात उभ्या राहणार आहेत. मात्र स्थानिक मच्छीमारांनी याला विरोध केल्याने काहीसे तणावाचे वातावरण आहे.

बंदी आदेश एक ऑगस्टला उठला असला, तरी अजून मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्याएवढे पोषक वातावरण नाही. अतिवृष्टी आणि वादळी वार्‍यामुळे बंदी आदेश उठूनही मासेमारीची मुहुर्त मच्छीरांना साधता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी पाऊस कमी असल्याने 5 ते 10 टक्के मच्छीमारांनी धोका पत्करून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित असा माशांचा रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे सध्यातरी 100 टक्के मासेमारी बंद असल्याचा मत्स्य विभागाचा दावा आहे. त्यात 11 तारखेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

रायगड आणि मुंबईत मच्छीमारांनी अतिवृष्टी आणि वादळी वार्‍याची तमा न बाळगता मासेमारीचा मुहुर्त साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो चांगलाच अंगलट आला आहे. समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे रायगड, मुंबई येथील 250 मच्छीमार आश्रयासाठी जयगड बंदरात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आठवडाभर ते या बंदरात आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील मच्छीमारांनाच बंदरात मासे उतरण्याची परवानगी असते.

दुसर्‍या जिल्ह्यातील मच्छीमारांना नाही. परजिल्ह्यातील हे मच्छीमार रत्नागिरीत मासे उतरून फायदा करून घेण्याच्या शक्यतेने स्थानिक मच्छीमारांनी त्याला विरोध केला. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर मत्स्य विभागाला याची माहिती मिळाली. मत्स्य विभागाने परजिल्ह्यातील मच्छीमारांना मासळी न उतरविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे वातावरण निवळले आहे. रविवार (ता. 11) पर्यंत हायअलर्ट असल्याने 250 नौका तोवर जयगड बंदरात विसावणार आहेत.

मासेमारी बंदी उठल्यानंतर अतिवृष्टी आणि वादळीवार्‍याचा विचार न करता मुंबई-रायगडच्या नौका समुद्रात गेल्या होत्या. मात्र परिस्थिती धोकादायक बनल्याने ते जयगड येथे सुरक्षित बंदरात आश्रयाला आले आहेत. सुमारे 250 नौका असून 11 पर्यंत त्या येथे राहणार आहे. त्यांना मासे उतरविण्यास मज्जाव केला आहे.
- आनंद पालव,

सहायक मत्स्य आयुक्त रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai, Raigad 250 boats in Jaygad port due to High alert