कृषी दिन विशेषः चाकरमानी वळले शेतीकडे 

राजेश कळंबटे
मंगळवार, 30 जून 2020

पावसाळ्यात शेती करायची आणि हिवाळा, उन्हाळ्यात मजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. कोकणातील बहुतांश तरुण वर्ग मुंबईत कामासाठी जात असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या मनिऑर्डरचा आधार गावाकडील लोकांना होता.

रत्नागिरी - नोकरीसाठी मुंबईसह परजिल्ह्यात जाणारा तरुण वर्ग आणि भातशेती परवडत नसल्याने कोकणातील अनेकांनी भातशेतीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत हजारो हेक्‍टर क्षेत्र पडिक झाले होते; मात्र कोरोनामुळे मुंबईकर चाकरमानी गावी परतला आहे. हाताला काम नसल्याने त्यांनी शेतीच्या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 3 ते 5 हजार हेक्‍टर पडिक क्षेत्र भाताशेतीसाठी वापरले जाण्याची शक्‍यता आहे. 
कोकणात भातशेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते.

पावसाळ्यात शेती करायची आणि हिवाळा, उन्हाळ्यात मजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. कोकणातील बहुतांश तरुण वर्ग मुंबईत कामासाठी जात असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या मनिऑर्डरचा आधार गावाकडील लोकांना होता. त्या परिस्थितीमध्ये काही अंशी बदल झाला असला तरीही कोकणातून मुंबई, पुण्याकडे नोकरीसाठी जाणारा वर्ग अजूनही कमी झालेला नाही.

त्याचा परिणाम भातशेती क्षेत्रावरही झालेला आहे. त्याचबरोबर कोकणातील बिगरशेती क्षेत्रातही हळूहळू वाढ होत आहे. पर्यटनासह विविध खासगी कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्यामुळे शेतजमीन विक्री करण्याचा सपाटाही गेल्या दहा वर्षांत वाढला आहे. जुन्या विचारांची माणसं आजही शेतीलाच प्राधान्य देत आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी 67 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली. यंदा ते क्षेत्र दहा टक्‍केने वाढण्याची शक्‍यता कृषी विभागाकडूनच वर्तविण्यात आली आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले आहेत. हातात रोजगार नसल्यामुळे अनेकांनी शेतीचा पर्याय निवडलेला आहे.

गावातील भाऊबंदांच्या बरोबरीने तेही शेतात उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पडिक राहिलेले सुमारे चार ते पाच हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातही हे चित्र कायम राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. 

यंदा भाताचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील काही गावांमध्ये आलेल्या चाकरमान्यांनी आपापल्या शेतामध्ये लागवड करण्यास सुरुवात केली आहे. फळबाग लागवडीलाही प्राधान्य दिले आहे. 
- व्ही. एम. हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Service Man Return To Farming Agriculture Day Special