esakal | शेकडो चाकरमानी रेल्वेने सिंधुदुर्गात, यंत्रणेची धावपळ

बोलून बातमी शोधा

mumbai workers come konkan sindhudurg

दरम्यान, रेल्वे स्थानकात आज ठराविक संख्येनेच रिक्षा होत्या. तर एसटी सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे शहर आणि परिसरात आलेल्या चाकरमान्यांना भर उन्हात पायपीट करत घरी जावे लागले. तर लगतच्या गावातील प्रवाशांनी खासगी वाहने बोलावून घर गाठणे पसंत केले. 

शेकडो चाकरमानी रेल्वेने सिंधुदुर्गात, यंत्रणेची धावपळ
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - गुढी पाडवा सण साजरा करण्यासाठी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी एक्‍स्प्रेसमधून शेकडो चाकरमानी सिंधुदुर्गातील विविध स्थानकावर दाखल झाले. यातील अनेक प्रवाशांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्रही आणले नव्हते. तर दुपारी दोन वाजेपर्यंत कोरोना चाचणी प्रमाणपत्र तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची यंत्रणा रेल्वे स्थानकावर नसल्याचे चित्र आज होते. 

दरम्यान, रेल्वे स्थानकात आज ठराविक संख्येनेच रिक्षा होत्या. तर एसटी सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे शहर आणि परिसरात आलेल्या चाकरमान्यांना भर उन्हात पायपीट करत घरी जावे लागले. तर लगतच्या गावातील प्रवाशांनी खासगी वाहने बोलावून घर गाठणे पसंत केले. 
राज्यात शनिवार आणि रविवार कडक लॉकडाउन असले तरी रेल्वेसेवा सुरू आहेत. त्यामुळे विविध एक्‍स्प्रेसमधून शेकडो चाकरमानी दाखल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणणे सक्‍तीचे केले होते; मात्र असे प्रमाणपत्र अथवा रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांची नोंद ठेवण्याचीही सुविधा दुपारी दोन वाजेपर्यंत कणकवली रेल्वे स्थानकात नव्हती. 

याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे स्थानकात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंदणी आणि आरोग्य तपासणीचे निर्देश दिले. त्यामुळे दुपारी अडीच नंतर विशेष रेल्वेतून आलेल्या सर्व प्रवाशांची नोंदणी तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, आज कडक लॉकडाउन असल्याने रेल्वेस्थानक वगळता शहरातील उर्वरित सर्व थांब्यावरील रिक्षा बंद होत्या. 

प्रवाशांना त्रास 
लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांकडून दंड आकारण्यात आला. कारवाईनंतर रिक्षा चालकांनी तेथून जाणे पसंत केले; मात्र रेल्वे स्थानकात रिक्षा नसेल तर रेल्वेतून येणारे प्रवासी घरी जाणार कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला. काही रिक्षांना स्थानकातच थांबण्यास मुभा दिली; मात्र त्यांना केवळ दोनच प्रवासी नेण्याचे बंधन घालण्यात आले. शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाउन असल्याने आज एसटी सेवा बंद होती. त्यामुळे विविध रेल्वे गाड्यातून आलेल्या प्रवाशांना भर उन्हात पायपीट करावी लागली. 

कोरोना वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरू आहे. यात त्रुटी राहिल्याने रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी झाली नाही; मात्र दुपारनंतर लगेच वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले. तसेच आता सर्वच रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथके सज्ज आहेत. तेथे प्रवाशांची नोंद आणि प्राथमिक तपासणीही केली जात आहे. 
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

संपादन - राहुल पाटील