क्षुल्लक कारणातून तरुणाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी (ता. १०) रात्री उशिरा घडली.

कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी (ता. १०) रात्री उशिरा घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित मुज्जफर पटेल आणि अफजल शेख हे जीवलग मित्र होते. नेहमी ते एकत्र असायचे. दोन महिन्यांपूर्वी अफजल शेख याने पटेल याला ‘तुझे भावोजी माझ्या शापामुळे मेले’, असे सांगितले होते. हा राग त्याच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास या दोन मित्रांमध्ये पूर्वीच्या वादातून बाचाबाची झाली होती. त्यावेळी एकमेकास शिवीगाळही केली होती. तत्पूर्वी, त्यांनी तेथीलच एका कब्रस्तानात एकत्रित दारूची पार्टी केली होती. त्यानंतर अफजलने फोन करून पटेल याला तुझ्या भावोजीप्रमाणे तुझी मुलेही माझ्या शापाने मरतील, असे सांगितले. यातून हा वाद वाढत गेला. मुजफ्फर पटेल हा जेवण झाल्यानंतर घरी होता. यावेळी घराबाहेर येऊन शेख याने सर्वांना शिवीगाळ केली.

यावेळी त्याच्या चुलत भावजयीने पटेल याला घरातच कोंडून ठेवले; मात्र काही वेळाने मुजफ्फर हा हातात फरशी घेऊन घराबाहेर पडला, तर शेख हा हातात सळी घेऊन घराबाहेर पडला होता. हे दोघे एकत्र झाल्यानंतर दोघांत हाणामारी झाली. यावेळी पटेलने हातातील फरशीने अफजलच्या छातीत, पोटात, डाव्या कुशीत आणि डाव्या पाठीवर फरशीने वार केले. त्यामुळे अफजल रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही माहिती शेजारच्यांना कळताच मुजफ्फरने जंगलमय भागात पळ काढला. नातेवाइकांनी अफलजला रुग्णालयात दाखल केले; पण त्याचा मृत्यू झाला होता.

खुनाची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोधही सुरू झाला; मात्र संशयित जंगलमय भागात होता. सकाळी तो घरी आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी त्याला घरात कोंडून ठेवले आणि पोलिसांना बोलावले. त्यामुळे संशयित पोलिसांना सापडला.

अफजल हा कणकवलीत एका शोरूममध्ये कामाला होता; तर मुजफ्फर हा सुरक्षारक्षकाचे काम करत असे. अफजलच्या मागे आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित पटेल याला उद्या (ता. १२) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नातेवाइकांना सुरक्षितस्थळी हलविले
मृत शेख याचे नातेवाईक प्रचंड संतप्त होते. त्यांनी संशयितास अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. संशयिताच्या नातेवाइकांनाही अटक करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी संशयिताच्या नातेवाइकांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence in Kankavali