पालीतील मुस्लिम बांधव पुरग्रस्तांसाठी एकवटले

अमित गवळे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

- : पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे.

- पूरग्रस्थांच्या मदतीला अनेकांचे हात सरसावले आहेत. आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पालीतील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे.

- आज बकरी ईद निमित्त इदुल अजहा ची नमाज पठन केल्यानंतर जामा मस्जिद पाली येथे मदतीची झोळी पसरवून आर्थिक निधी गोळा केला गेला.

पाली : पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. पूरग्रस्थांच्या मदतीला अनेकांचे हात सरसावले आहेत. आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पालीतील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. आज बकरी ईद निमित्त इदुल अजहा ची नमाज पठन केल्यानंतर जामा मस्जिद पाली येथे मदतीची झोळी पसरवून आर्थिक निधी गोळा केला गेला. तसेच येथील अजीज पानसरे, इम्तियाज पठाण यांनी कुर्बानीचा खर्च टाळून जमा झालेले पैसे पूरग्रस्थांना दिले आहेत.

बकरी ईद निमित्त सर्वच मुस्लिम बांधव येथील मशिदीमध्ये जमा झाले होते. यावेळी सर्वांनी मिळून कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्याचे ठरविले. मग मदतीची झोळी पसरविण्यात आली. यावेळी सर्वच मुस्लिम बांधवांनी सढळ हस्ते झोळीत भरभरून निधी गोळा केला. हा जमा झालेला मदत निधी पाली तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. पालीतील मुस्लिम बांधव सर्व धर्माच्या उपक्रमात सहभागी होतातच आणि सहकार्यसुध्दा करतात. पूरग्रस्थांना मदत करण्यात देखील ते मागे राहिलेले नाहीत.

यावेळी सुलतान बेनसेकर, महम्मद अली धनसे, बशीरभाई परबळकर, इम्तियाज पठाण, अजीज पानसरे, इस्माईल परबळकर, हुसेन लद्दु, युसूफ पठाण, असिक मणियार, इमदाज पठाण, समद पठाण, एजाज पानसरे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

"या आपत्तीने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे आपले सर्वांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. यातूनच बकरी ईद सणाच्या दिवशी कुर्बानीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही सारे एकवटलो आहोत. पूरग्रस्त बांधवांना दिलेली मदत हेच आमचे मोठे समाधान आहे." 
अजीज पानसरे, मुस्लिम बांधव, पाली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslims from Pali help flood survivors