आमचे आरोग्य आम्ही बघू ,तुम्ही तपासणी करू नका म्हणत ‘माझे कुटुंब’ मोहीमेस ग्रामस्थांचा विरोध

मुझफ्फर खान
Sunday, 27 September 2020

भयगंडाचा परिणाम; आरोग्य विभागाची कसोटी

चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली. या मोहिमेत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची थर्मोमीटरने ताप व ऑक्‍सिमीटरने ऑक्‍सिजन तपासणी केली जात आहे. संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी नेले जात असल्याने या मोहिमेस तालुक्‍यातील मालदोली येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.
कुटुंबात एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळला की, त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. ही गावोगावी वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे आमचे आरोग्य आम्ही बघून घेतो. तुम्ही आमची तपासणी करू नका, अशी भूमिका ग्रामस्थ घेऊ लागले आहेत. त्यातच सर्वेक्षणातील माहिती ऑनलाईन टाकली जाते. तपासणीत काही कमी जास्त असेल तर पुन्हा आरोग्य विभागाचा ससेमिरा मागे लागेल, अशीही ग्रामस्थांना भीती आहे. ग्रामस्थांच्या विरोधानंतर ग्रामसेवकांनी गावातील सर्व वाडीप्रमुखांची बैठक घेतली. या मोहिमेसाठी शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती दिली, तरीही ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर झाली नाही. तपासणीत संशयित असलेल्या रुग्णांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात येत असल्याने हा उद्रेक निर्माण होत आहे. तपासणीवेळी लोकांचा विरोध होईल. त्यामुळे वाद न करता प्रेमाने परिस्थिती हाताळण्याची सूचना मोहीम शुभारंभावेळीच आमदार भास्कर जाधव यांनी दिली होती. त्यामुळे सर्वेक्षणावेळी ग्रामस्थांना विश्‍वासात घेत त्यांना पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. 

हेही वाचा-  World Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची  गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार -

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत काही वाड्यांमध्ये ग्रामस्थांची तपासणी झाली; मात्र काही ठिकाणी लोकांचा विरोध होत आहे. कोरोनाबाबत लोकांमध्ये भीती आहे. एखाद्याची ऑक्‍सिजन लेव्हल थोडी कमी झाली तर तिच लेव्हल दुसऱ्या दिवशीही तशीच राहील, असे नाही. विरोध नाही, त्यांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 
- पांडुरंग माळी, उपसभापती, चिपळूण

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family my responsibility campaign Villagers oppose scheme ratnagiri chiplun