राष्ट्रवादी रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी `यांचे` नाव निश्चित

Nana Mayekar New NCP Ratnagiri Taluka President
Nana Mayekar New NCP Ratnagiri Taluka President

रत्नागिरी - रिक्त असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी पुन्हा नाना मयेकर यांची निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा रविवारी (ता. 13) जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव 13 तारखेला नियुक्तीपत्र देऊन करणार असल्याचे समजते. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम माजी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केले. त्यामुळे त्यांनी पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा स्वतंत्र उमेदवार दिला. विधानसभा निवडणुकीलादेखील स्वतः शिवसेनेचे तगडे उमेदवार उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले. शहरासह काही महत्त्वाचे प्रश्‍न हाताळले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुक्‍यात जिवंत झाली; मात्र पालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या नगरसेवकांवर हकालपट्टीची कारवाई करणे सुदेश मयेकर यांना चांगलेच भोवले.

वरिष्ठांनीही याचे राजकारण केले. पक्षासाठी एकाकी लढणाऱ्या सुदेश मयेकर यांना पक्ष कात्रीत पकडू लागल्याने त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांचा रोष वाढत गेल्याने काम थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा वरिष्ठांकडे राजीनामा दिला. त्यामुळे सुमारे दीड वर्षे हे पद रिक्त होते. त्या जागी पुन्हा एकदा नाना मयेकर यांची अधिकृत निवड 13 तारखेला होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून नाना मयेकर पक्षात होते; मात्र मधल्या काळात ते कॉंग्रेसच्या आश्रयाला गेले होते.

तेथेही त्यांना कॉंग्रेसने तालुक्‍याची जबाबदारी दिली होती; मात्र कॉंग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही महिने ते तटस्थ होते. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांना पुन्हा संधी मिळली आहे. 

सुरवातीला तालुकाध्यक्ष पदावरही त्यांनी काम केले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत. राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्याची संधी नाना मयेकर यांना मिळाली आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना जिल्हा कार्यकारिणीवर घेतले जाणार असल्याचे समजते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com