esakal | रिफायनरी समर्थनार्थ सुशिक्षित थेट रस्त्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

nanar project ratnagiri ad shashikant sutar

सुशिक्षित वर्गाने आता रिफायनरी समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे

रिफायनरी समर्थनार्थ सुशिक्षित थेट रस्त्यावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - तालुक्‍यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरीला दिवसागणिक समर्थन वाढत असताना सुशिक्षित वर्गाने आता रिफायनरी समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. हीच भविष्यातील राजापूरच्या विकासाची नांदी आहे, असा विश्‍वास रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. शशिकांत सुतार यांनी व्यक्त केला आहे. 


दरम्यान, रिफायनरी समर्थनासाठी समन्वय समिती गठित केली असून त्याच्या अध्यक्षपदी सुतार यांची निवड झाली. यानंतर ऍड. सुतार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिफायनरी प्रकल्प नको, म्हणणाऱ्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणाऱ्या कोणत्या प्रकल्पाची शिफारस केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रिफायनरी प्रकल्प कोणत्याही जागेत करा, पण तो राजापुरातच करा, अशी मागणीही त्यांनी केली. अनेक प्रकल्पविरोधी आंदोलनातून राजापूरचे नेतृत्व एनजीओ संस्था करतानाचे चित्र दिसत आहे. असे असताना येथील जनतेला वा लोकप्रतिनिधींना त्या प्रकल्पासंबंधित स्वतः चा अभ्यास वा मत आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
  
अचानक अवतीर्ण होणाऱ्या एनजीओ 
कोणत्याही प्रकल्पाच्या फक्त विरोधासाठीच अचानक अवतीर्ण होणाऱ्या एनजीओंकडून प्रकल्पविरोधी वातावरण निर्मिती करून प्रकल्प लांबणीवर टाकला जातो. त्याने देशाच्या विकासाला एकप्रकारे खीळ बसते. मात्र, या एनजीओ संस्थांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा खर्च नेमका कशातून होतो? त्यासाठी या संस्था पैशाचा मेळ कसा घालतात? असा रोखठोक सवाल ऍड. सुतार यांनी केला. 
 
जनसुनावणीत आक्षेपांचे चिरफाड होण्याच्या भीतीने.. 
सुतार म्हणाले की, "तालुक्‍यात कोणताही प्रकल्प आला की, काही मोजक्‍या एनजीओ येऊन तालुक्‍याच्या विकासाची कळवळ असल्याचे भासवितात. त्यांना अशिक्षित समाजाला प्रभावित करण्यात येत असले तरी, या एनजीओ संस्था कधीही सुशिक्षित समाजासमोर का पुढे आलेल्या नाहीत? प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन केले जाते. मात्र, प्रकल्पविरोधात वातावरणनिर्मिती करणाऱ्या एनजीओ संस्था या जनसुनावणीमध्ये त्यांच्या आक्षेपांचे चिरफाड होण्याच्या भीतीने सहभागी होत नाहीत, असा टोलाही ऍड. सुतार यांनी लगावला. 

हे पण वाचाभावजयीपाठोपाठ दिराच्या निधनाने हळहळ
 
समन्वय समिती अध्यक्षपदी सुतार यांची निवड 
तालुक्‍यातील विविध सामाजिक संघटना एकत्र येत, त्यांनी रिफायनरी समर्थनाचा एल्गार पुकारला आहे. या समित्यांची एकत्रित समन्वय समिती नुकतीच गठित केली असून त्याच्या अध्यक्षपदी ऍड. सुतार यांची निवड केली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image