'जठारांना सल्ला देणार्‍यांनी आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे'

राजेंद्र बाईत
Thursday, 27 August 2020

सल्ला देणार्‍यांनी आपल्या खासदारांना प्रथम आपल्या मतदार संघात लक्ष घालण्यास सांगावे.

राजापूर (रत्नागिरी) :  “ शिवसेना  खासदार विनायक राऊत यांच्या पोपटाची भूमिका बजावणार्‍या प्रकाश कुवळेकर यांची रिफायनरीवर बोलण्याची नव्हे तर, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर टिका करण्याची पात्रता नाही. प्रमोद जठार यांना त्यांच्या मतदार संघात लक्ष घालण्याचा सल्ला देणार्‍यांनी आपल्या खासदारांना प्रथम आपल्या मतदार संघात लक्ष घालण्यास सांगावे. भाजपच्या दोन लाख मतांमुळे ते खासदार म्हणून निवडून आले आहेत हे विसरू नका.” असे रोखठोक प्रत्युत्तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांना दिला   आहे.

काही दिवसापूर्वी रिफायनरीच्या मुद्दायावरून माजी आमदार श्री. जठार यांनी खासदार श्री. राऊत यांच्यावर टिका केली होती. त्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. कुवळेकर यांनी प्रत्युत्तर देताना श्री. जठार यांच्यावर टिका करीत त्यांना आपल्या मतदारसंघात लक्ष घालण्याचा सल्ला दिला होता. त्याचा भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. गुरव यांनी आज खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला आहे.

हेही वाचा- कोकणची संस्कृती ; आया ओ ओवेसेते...गौराईबाई

अशी आहे प्रथा

यावेळी बोलताना श्री. गुरव म्हणाले की “  श्री. कुवळेकर यांना रिफायनरीतलं काय कळतयं ? आपला अभ्यास किती अन् बोलतात किती ? कोणाची किती लाचारी करायची ? मुख्यमंत्र्यांशी काही शास्त्रज्ञांनी रिफायनरीच्या अनुषंगाने नुकतीच चर्चा केली त्यावेळी त्यांनी काय सांगितले हे तरी माहित आहे काय ? हे सारे आधी जाणून आणि समजून घ्या मगच बोला. तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी विकास आणि रोजगाराच्या मुद्यावर रिफायनरीला जाहिर पाठींबा दिला आहे. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून, प्रकल्प विरोधासाठी गुपचूप बैठका घेतल्या जातात. हीच काय शिवसेना स्टाईल ? ”  यावेळी पुढे बोलताना प्रकल्पाला समर्थन दिलात तर, राजापूरवासिय तुम्हाला आजन्म शिवसेना तालुका प्रमुखपदी कायम ठेवतील असा उपरोधिक सल्लाही श्री. गुरव यांनी श्री. कुवळेकर यांना दिला आहे.

हेही वाचा-बापाने फासला नात्याला काळीमा , मुलीला केले कुमारी माता -

दलालीच्या मुद्दयावरून जुंपली

शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर टिका करताना ‘दलालांचे चौकीदार’ असा नामोल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी समाचार घेताना म्हणाले की, “ प्रकाश कुवळेकर यांनी आरोप सिध्द करावेत, उगीच खासदार विनायक राऊतांची पोपटपंची करू नये. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील दलालीत शिवसेना पदाधिकारी असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. दरवेळी स्थानिकत्वाच्या मुद्यावर विधानसभेची तिकीट मागता आणि मग आपण दलाली कशी करता ? याची माहिती सर्वज्ञात आहे. ” 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nanar project Strong response BJP taluka president Abhijit Gurav over to Shiv Sena taluka chief Prakash Kuvalekar