नाणार रिफायनरी प्रकल्प हवाच; मालवण पंचायत समिती ऑनलाईन सभेत ठराव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

वाढीव वीज बिल प्रश्नी राज्य सरकारने जाहीर केलेली सूट फसवी आहे. गतवर्षीच्या तुलनेत जर यावर्षी वाढीव वीज बिले आली असल्यास त्या वाढीव आलेल्या फरकाच्या रक्कमेत 50 टक्के सूट म्हणजे सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे, असे सांगत उपसभापती राजू परुळेकर यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

मालवण ( सिंधुदुर्ग ) -  नाणार येथील प्रस्तावित आशिया खंडातील सर्वांत मोठा रिफायनरी प्रकल्प झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. मालवणसह जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे नाणार प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, असा ठराव पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी आजच्या पंचायत समितीच्या ऑनलाईन झालेल्या मासिक सभेत मांडला. एकमुखाने हा ठराव मंजूर झाला; मात्र नाणार प्रकल्पास विरोध दर्शवणाऱ्या शिवसेना पक्षाच्या दोन महिला सदस्य सभेस उपस्थित असताना त्यांनी या ठरावाबाबत कोणतीही विरोधी भूमिका घेतली नाही. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा कोरोना पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पार पडली. जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सांगितले. सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा झाली.

सभेत उपसभापती राजू परुळेकर, सदस्य अशोक बागवे, गटनेते सुनील घाडीगावकर, विनोद आळवे, कमलाकर गावडे, सागरिका लाड, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर सहभागी झाले. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर व काही प्रमुख अधिकारी पंचायत समिती येथून ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते. 

वाढीव वीज बिल प्रश्नी राज्य सरकारने जाहीर केलेली सूट फसवी आहे. गतवर्षीच्या तुलनेत जर यावर्षी वाढीव वीज बिले आली असल्यास त्या वाढीव आलेल्या फरकाच्या रक्कमेत 50 टक्के सूट म्हणजे सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे, असे सांगत उपसभापती राजू परुळेकर यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला. बीएसएनएल, कृषी, बांधकामच्या कारभाराबाबत परुळेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. लिंगडाळ, मठबुद्रुक, पळसब या मार्गावर जिओ केबल टाकताना केलेल्या खोदाईमुळे मार्ग धोकादायक बनला आहे. तरी लवकरात लवकर खोदाई केलेला भाग सुस्थितीत आणावा, अशा सूचना परुळेकर यांनी बांधकाम विभागास दिल्या.

मुसळधार पावसात शेती सोबत सुपारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी नुकसानीचे पंचनामे करून शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीचा ठरावही उपसभापती राजू परुळेकर यांनी मांडला. 

ग्रामीण भागातील बसफेऱ्या नियमित सुरू व्हाव्यात, अशी मागणी अशोक बागवे, घाडीगावकर यांनी केली. गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास येणारा निधी यावर्षी न आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीही तोडण्यात आली नाही. बांधकाम विभागाकडे कामगार नाहीत. जनतेने करायचे काय असा सवाल सुनील घाडीगावकर यांनी उपस्थित करत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली.

ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा अनेक दिवस बंद आहेत. तरी सेवा सुरळीत करावी अशी सूचना उपसभापती राजू परुळेकर व घाडीगावकर यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना केली. 10 वी 12 वी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तालुक्‍यातील सर्व प्रशालेतील विद्यार्थ्यांना माजी खासदार निलेश राणे यांनी टॅब देत सत्कार केला. पंचायत समितीस रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. याबाबत गटनेते सुनील घाडीगावकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील सहावी, सातवीतील मुलांना आमिष दाखवून हायस्कुलमध्ये नेले जात आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भीती आहे. काही शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षक कमी होऊन मुलांचे नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुविधा चांगले शिक्षण असताना हायस्कूलच्या अशा प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होण्याची भीती आहे. तरी यावर उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी गटनेते सुनील घाडीगावकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanar Refinery Project Resolution In Malvan Panchayat Samiti