संभाव्य भाजप प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना राणेंकडून भावनिक हाक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 August 2019

कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत. 

कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. हा प्रवेश सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्‍यता आहे. राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करतील, अशी शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी रणनितीची कल्पना पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी स्वतः राणे बैठका घेत आहेत.

काल (ता.25) कणकवलीत तर आज पडवे येथे त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज पडवेतील सभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे बहुसंख्य जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात त्यांनी आपल्या सोबत येण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भावनिक साद घातल्याचे समजते. 

राणेंचे गावोगाव कार्यकर्त्यांचे मोठे केडर आहे. त्यांच्यापर्यंत अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना पोहोचलेल्या नाहीत; मात्र आगामी काळात काहीतरी मोठी राजकीय घडामोड असल्याची कल्पना त्यांना आली आहे. 

10 सप्टेंबरनंतर शक्‍यता 
राणे यांनी दिल्लीत अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदिल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू टाकला होता. यानंतर राणेंची श्री. फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगवान झाल्या. प्रवेशप्रक्रिया 10 सप्टेंबरनंतर होण्याची शक्‍यता आता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Bjp entry At a turning point