राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमानचे उद्या भाजपमध्ये विलीनीकरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कणकवली - माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष उद्या (ता. 2) भाजपमध्ये विलीन करणार आहेत. मुंबईत राणेंचा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते आज सायंकाळी मुंबईला रवाना झाले. तर कणकवली मतदारसंघात भाजपतर्फे नीतेश राणे हेच उमेदवार असतील हे देखील जवळपास निश्‍चित झाल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

कणकवली - माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष उद्या (ता. 2) भाजपमध्ये विलीन करणार आहेत. मुंबईत राणेंचा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते आज सायंकाळी मुंबईला रवाना झाले. तर कणकवली मतदारसंघात भाजपतर्फे नीतेश राणे हेच उमेदवार असतील हे देखील जवळपास निश्‍चित झाल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

आज सायंकाळी उशिरा सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचेही ते म्हणाले. 

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या गेले अनेक दिवस उठत होत्या; मात्र उद्या (ता. 2) गांधी जयंतीच्या औचित्यावर प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राणेंचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. उद्याच्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर गुरुवारी (ता. 3) राणे आपल्या कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

राणेंच्या भाजप प्रवेशामुळे कणकवली मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी निश्‍चित झाली आहे; तर राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांना उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

राज्यात शिवसेनेची भाजपसोबत युती असेल; पण कणकवली मतदारसंघात जर भाजपकडून राणे उमेदवार असतील तर शिवसेना देखील तेथे उमेदवार उभा करणार असल्याची ठाम भूमिका शिवसेना पक्षाकडून घेण्यात आली आहे. तसे झाल्यास कणकवलीत राणे विरुद्ध सावंत अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. 

संदेश पारकर उद्या अर्ज दाखल करणार 
भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढणारच असे जाहीर केले आहे. ते गुरुवारी (ता. 3) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कणकवली मतदारसंघात भाजपकडून आपणालाच उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी आज दिली. 

राणेंच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी 
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून देखील सिंधुदुर्गात भाजप संघटनेला फारशी ताकद निर्माण करता आलेली नाही. आता राणेंच्या प्रवेशानंतर सिंधुदुर्गात भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल. कणकवली मतदारसंघातूनही भाजपला हक्‍काचा उमेदवार मिळेल. सिंधुदुर्गात भाजपला बळकटी येण्यासाठी राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Maharashtra Swabhiman Party will merge in BJP