आजारी, गरोदर महिलांना मरणयातना ; तालुक्‍यातील शेकडो गावांना जोडणाऱ्या महामार्गाची अशी अवस्था...

सचिन माळी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 मंडणगड-पाले रस्ता; सात कि. मी. चा रस्ता खड्ड्यात.. 

मंडणगड  (रत्नागिरी) : राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा मिळालेला आंबडवे-लोणंद मार्गावर मंडणगड-तुळशी-पाले दरम्यान सात कि. मी. चा रस्ता खड्डेमय झाला आहे. या दरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर स्त्रिया, आजारी, वयोवृद्ध नागरिकांसाठी हा रस्ता खड्ड्यांमुळे मरणयातना देणारा ठरतोय. 

तालुक्‍यातील शेकडो गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन संबंधित विभाग व ठेकेदारांनी तालुका प्रशासनाला दिले होते. मात्र, तसे काहीच घडले नाही. आता हा रस्ता पावसाळ्यात पूर्णतः उखडला असून जागोजागी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागतेय. मंडणगड येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या गरोदर स्त्रिया, आजारी व वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करणे, हे मरणयातना सोसण्यासारखे झाले आहे. अत्यावश्‍यक सेवेच्या वेळी हा रस्ता वेळ वाया घालविणारा आणि नागरिकांचे जीवन धोक्‍यात टाकणारा ठरतोय.

हेही वाचा- कोकणात भेंडीच्या एका झाडापासून दीड किलो उत्पादन ; भाताचे रत्नागिरी चार, लाल भेंडीचे नवीन वाणांची नोंदणी मंजूर.... -

 

पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळ जातो. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचे आकार ओळखून येत नाहीत. परिणामी वाहने जोरात आपटून वाहनांची वारंवार दुरुस्तीची कामे निघत आहेत. जांभा चिरा व मातीचा भराव टाकून मलमपट्टी करीत असल्याचे चित्र दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने संबंधित यंत्रणेचे फावले आहे. 

हेही वाचा-अखेर दोन महिन्यांनी गुहागरमध्ये त्याने केलीच एंट्री... -
 
पालेकोंड येथे महिलांच्या जीविताला धोका 
पालेकोंड येथे पिण्याच्या पाण्याची विहीर आडाचे पाणी येथे रस्त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाणी आणण्यासाठी महिलांना हा रस्ता ओलांडून जावे लागते. मात्र, पायवाटेवर मातीचा भराव टाकल्याने व पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग न ठेवल्याने तिथे प्रचंड चिखल झाला आहे. 24 तास वाहने सुरू असल्यामुळे रस्ता ओलांडणे कठीण बनले आहे. त्यामुळे पाणी आणणाऱ्या महिलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Highways Seven km Mandangad Tulsi Palace on Ambadve Lonand road destroyed