लढवय्ये : निसर्गवादळ आणि कोकणी माणुस..

Natural storm and Konkani people story in ratnagiri
Natural storm and Konkani people story in ratnagiri
Updated on

रत्नागिरी :  वादळग्रस्त ग्रामस्थ कोणी आपल्या मदतीला येईल याची वाट न पहाता स्वतःच मैदानात उतरलेत.आपापलं स्टेटस आणि वयं विसरुन सगळ्या घरातले सगळे पुरुष कामगार बनलेत.एक टीम घरावरची कौलं बसवतेय तर एक टीम कटरच्या सहाय्याने झाडं तोडुन मार्ग मोकळे करते आहे.एक टीम पाण्याच्या टाक्या भरुन देते आहे.काही नेहमी कामावर येणारे कामगारही आपापल्या घरची कामं सांभाळुन मधेच यांना जॉइन होतायत.मला खात्री आहे जे आत्ता मुर्डीत चालू आहे,तेच आंजर्ल्यात, तेच केळशीला नि तेच वेळासला..आणि किनारपट्टीवरच्या अन्य गावात चालू असणार आहे..सलाम त्यांच्या लढवय्या वृत्तीला 

श्रीवर्धन, दिवे आगरकडले व्हिडिओ येऊ लागले आणि वादळाचा गंभीरपणा कळू लागला...वारंवार फोन करुनही मुर्डी (आंजर्ला) येथील बहिणीच्या घरच्या कोणाशीच संपर्क होऊ शकला नाही.
मुर्डीला वादळामुळे भयंकर नुकसान झालंय, झाडं वगैरे पडली आहेत अशी सांगोवांगी बातमी मिळाली आहे...जरुरीच्या काही वस्तू सोबत घेऊन आम्ही चिपळूण सोडलं.दापोली ते आंजर्ला या रस्त्याला लागल्यानंतर मात्र हाहाकार,वाताहात, विस्कोट,विध्वंस हे शब्द दृश्य रुपात सामोरे येऊ लागले.हर्णै पाजपंढरीच्या रस्त्यावर निसर्गमुळे निसर्गाचं रुप किती बदललंय हे दिसत होतं.
एरवी हिरव्यागार दिसणा-या डोंगरावर हिरवा रंग नावाला सुद्धा दिसत नव्हता.

 बागा पडल्या मोडुन आडव्या

आडवी होण्यापासुन वाचलेल्या तुरळक उभ्या झाडांचे बोडके सांगाडे नजरेला अक्षरशः टोचत होते..परवापरवापर्यंत इथे नारळी पोफळीची डौलाने झुलणारी बाग होती हे कोणाला सांगुनही खरं वाटणार नाही अशा पद्धतीने बागाच्या बागा मोडुन आडव्या झालेल्या दिसल्या.खाडीपुलावर जाण्यापुर्वीच्या बायपासने जातांना एरवी समोरचं झाडीने वेढलेलं पांढरं शुभ्र गणपतीमंदिर आणि नारळी पोफळीच्या बागांनी सजलेला समुद्र किनारा दिसतो.अगदी खास कोकणातलं सौंदर्य दृश्यं.

घरावरची आणि वाड्यावरची कौलं धडाधड  गेली उडून .

पण काल कड्यावरचं गणपतीमंदिर कुठल्यातरी उजाड,बोडक्या डोंगरावर वसवल्यासारखं दिसत होतं आणि एरवी झाडीने झाकलेली समोरच्या डोंगरातली घरं आता अगदी थेट डोळ्यासमोर येत होती.जे माड जगले वाचलेले होते ते पर्ण गुच्छाऐवजी टोकाशी एखादं पान लेवुन उभे असलेले दिसत होते.मुर्डीत 20-22 घरं आहेत.काहींची घरं रहाण्यासारखी राहिलेली नाहीत ते शेजा-यांच्या घरी राहिले आहेत.


वादळाच्या दिवशी बहिणीच्या घरावरची आणि वाड्यावरची कौलं धडाधड उडून गेली.घरातल्या जिन्यावरुन धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं.घरातली वय वर्ष 2 ते वय वर्ष 65 ची पाच माणसं अक्षरशः नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडली.कारखान्याची तीच स्थिति.छप्पर गायब.दोन भिंतीनी जमिनीशी दोस्ती केलीय.घरामागच्या आगरात एकही झाड स्वतःच्या पायावर उभं नाही.कलमांच्या बागांमधेही एखादं दुसरं  झाड उभ्या स्थितीत असेल..  आर्थिक नुकसान कल्पनेपलीकडचं आहे..शुन्यापासुन परत सुरुवात करावी लागणार आहे.

भावनिक हादरा मोठा​

बहिणीचं उदाहरण वानगीदाखल सांगितलं.हीच स्थिती सर्वांची आहे..प्रमाण कमी अधिक.सगळ्यांच्याच आवारात रायवळ आणि हापूस आंबे, कोवळे आणि जून नारळ ,फणस यांचा खच पडलेला आहे.घर आणि परिसरात मोडलेल्या फांद्यांचं राज्यं आहे.आर्थिक फटका आहेच पण त्यापेक्षा भावनिक हादरा मोठा आहे,जो ज्याचा त्यालाच कळू शकतो..समजूत तरी कशी काढणार ? 
पण हे ग्रामस्थ कोणी आपल्या मदतीला येईल याची वाट न पहाता स्वतःच मैदानात उतरलेत.आपापलं स्टेटस आणि वयं विसरुन सगळ्या घरातले सगळे पुरुष कामगार बनलेत.

सगळे पुरुष  बनलेत कामगार 
एक टीम घरावरची कौलं बसवतेय तर एक टीम कटरच्या सहाय्याने झाडं तोडुन मार्ग मोकळे करते आहे.एक टीम पाण्याच्या टाक्या भरुन देते आहे...काही नेहमी कामावर येणारे कामगारही आपापल्या घरची कामं सांभाळुन मधेच यांना जॉइन होतायत.मला खात्री आहे जे आत्ता मुर्डीत चालू आहे,तेच आंजर्ल्यात, तेच केळशीला नि तेच वेळासला..आणि किनारपट्टीवरच्या अन्य गावात चालू असणार आहे..
वादळ मुंबईत आलं नाही,ते का आलं नाही, कसं आलं नाही यावर दिवसचे दिवस रवंथ करणा-या मिडियाला रत्नागिरी जिल्ह्यातील या काही गावांची दुर्दशा झाली आहे हे गावीही नव्हतं.
हस्तीदंती मनो-यात बसुन वादळाच्या छाताडावर नाचण्याच्या गोष्टी करणा-यांनी केवढंही मोठं संकट आलं तरी कपाळाला हात लावुन न बसता दैवाशी लढणं म्हणजे काय असतं याचं प्रात्यक्षिक म्हणुन कोकण किनारपट्टीवरील हे गावकरी अवश्य पहावेत.

संध्या साठे जोशी,चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com