esakal | कोकणात नवरंग'च्या आगमनाने मान्सूनची 'ऍडव्हान्स चाहूल'

बोलून बातमी शोधा

कोकणात नवरंग'च्या आगमनाने मान्सूनची 'ऍडव्हान्स चाहूल'

कोकणात नवरंग'च्या आगमनाने मान्सूनची 'ऍडव्हान्स चाहूल'

sakal_logo
By
राजेंद्र बाइत

राजापूर : मान्सूनच्या आगमन आणि निर्गमनामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने बदल झालेला असून मान्सूनचे वेळापत्रकच बदलले आहे. त्यातून वेधशाळेचे अंदाजही अनेकवेळा चुकीचे ठरत आहेत. अशा स्थितीमध्ये मान्सूनच्या आगमनाची साऱ्यांना 'ऍडव्हान्स चाहूल' देणाऱ्या नवरंग पक्ष्याचे कोकणामध्ये आगमन झाले आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याच्या वेधशाळेच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा मिळत आहे.

श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असे स्थलांतर करणारा नवरंग मान्सूनचा अंदाज येताच भारतामध्ये विशेषतः कोकणामध्ये येतो. मैनेएवढा भडक रंगाचा आणि भुंड्या शेपटीचा हा पक्षी रंगाने हिरवा आहे. निळा, तांबूस, काळा आणि पांढरा असा वरच्या अंगाचा रंग असून पोट आणि शेपटीचा खालचा भाग किरमिजी रंगाचा असतो. मनुष्यवस्तीच्या जवळ वा ओढे, नाले यांच्या सभोवतालच्या दाट झुडूपांमध्ये सर्रासपणे हा आढळतो.

हेही वाचा: रुग्णालयाबाहेरील ती दृश्‍ये काळीज पिळवटणारी

मे ते ऑगस्ट हा त्याच्या विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. गवत, काटक्‍या, वाळलेली पाने आदींपासून मोठे गोलाकार घरटे जमिनीवरील झुडपाच्या बुंध्याशी वा झाडावर हा बांधून त्या ठिकाणी नवजीवांना जन्म देतो. मान्सूनच्या आगमनाचे साऱ्यांचे अंदाज चुकत असताना नवरंग पक्षी निसर्गातील बदलानुसार मान्सूनच्या आगमनाची ऍडव्हान्स माहिती गेली कित्येक वर्षापासून साऱ्यांना देत आहे.

दृष्टीक्षेपात नवरंग पक्षी

  • इंग्रजी नाव - इंडीयन पिट्टा

  • हिंदी नाव - नवरंग

  • मराठी नाव - पाऊसपेव, पाचापिल, बहिरा पाखरू, बंदी, खाटीक, गोळफा

"श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असा स्थलांतराचा प्रवास करणारा नवरंग (इंडीयन पिट्टा) पक्ष्याचे एप्रिल महिन्यात आगमन होते. या पक्ष्याला मान्सूनच्या आगमनाची चांगलीच पूर्वचाहूल लागते. याच्या आगमनानंतर साधारणतः महिनाभराच्या कालावधीमध्ये मान्सूनचे आगमन होते. या पक्ष्याचे आगमन झाले असून त्यामुळे मान्सूनही लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत."

- धनंजय मराठे, पक्षीमित्र