esakal | रुग्णालयाबाहेरील ती दृश्‍ये काळीज पिळवटणारी

बोलून बातमी शोधा

fighters

रुग्णालयाबाहेरील ती दृश्‍ये काळीज पिळवटणारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : केवळ धाप लागली, म्हणून एखाद्याला रुग्णालयात ऍडमिट केले जाते. अचानक त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर बाहेर वरांड्यात नातेवाइकांनी केलेला आक्रोश आसमंतात पोचतोय. चिपळुणातील सरकारी व खासगी कोविड सेंटरच्या बाहेरील हे काळीज पिळवून टाकणारे दृश्‍य मन सुन्न करून जाते.

एखादा महापूर यावा, तशी कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात येऊन धडकली आहे. चालताना दम लागणे, श्‍वास घेताना त्रास होणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अचानक त्रास झाल्यानंतर लोक कोविड सेंटरचे दार ठोठावत आहेत. पण तेथे बेड उपलब्ध नाहीत. काहींना बेड उपलब्ध होतात तर काहींना वशीला लावल्यावरही बेड उपलब्ध होत नाहीत. आज कामथे उपजिल्हा रुग्णालयात रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या रहदारीने गजबजून गेले आहे.

हेही वाचा: आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडे पाहिल्यानंतर हृदय हेलावून टाकणारी दृश्‍ये नजरेस पडतात. जो-तो आपल्या आपणच काळजीने भयभीत झालेला पाहायला मिळतो. एकाचा मृत्यू झाल्याचे बाहेर कळले की रुग्णालयाबाहेर नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकतो. हा आक्रोश पाहून लक्षणे नाही, पण कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आणखीनच चिंतेत पडतात, भयभीत होतात.

लोक गर्दी करतातच

रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याने एका रुग्णासोबत एकाच व्यक्तीने रुग्णालयात यावे, अशा सूचना कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आल्या आहेत. तरीही काळजीपोटी घरातील तीन ते चार लोक रुग्णालयात येत होते. लोक झाडाचा आधार घेऊन तेथे थांबतात.

खेड, दापोली, गुहागरचे रुग्ण कामथेत

कामथे उपजिल्हा रुग्णालय मुंबई-गोवा महामार्गावर आहे. रस्त्यावर अनेक वाहने उभी असतात. अशावेळी मार्ग काढताना अडथळा होतो, म्हणून ऍम्ब्युलन्स सायरन वाजवत येते. सायरनचा आवाज ऐकूनच नातेवाइकांचे डोळे विस्फारतात. खेड, दापोली, गुहागर या भागातील रुग्णही कामथे रुग्णालयात आणले जात आहेत.

हेही वाचा: नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच

"कोरोनाची दुसरी लाट भयानक आहे. प्रत्येकाला काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना प्राथमिक लक्षणे दिसतात, त्यांनी व्यवस्थित उपचार घेतले तर कोरोना पूर्णपणे बरा होतो. नागरिकांनी बेफिकीर होऊन चालणार आहे."

- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी, कामथे उपजिल्हा रुग्णालय