काय सांगता ! भाजपची सुपारी घेणारेच घड्याळ चिन्हावर रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

शिवसेनेची प्रचार यंत्रणा शहरात जोरात राबत आहे. कॉर्नर सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पंधरा प्रभागापैकी पहिल्या पाच ते सात प्रभागामध्येच विजय होणार

रत्नागिरी - महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्याचे संकेत होते. दुर्दैवाने रत्नागिरीत राष्ट्रवादी आमच्या विरोधात लढत आहे. वरिष्ठ नेते या उमेदवारीबाबत अनभिज्ञ आहेत. भाजपची सुपारी घेऊनच सेनेतून आयात केलेल्याला घड्याळ चिन्हावर लढवित आहेत. काही चाणक्‍यांनी काही विशिष्ट मतदार फिरविण्यासाठी ही खेळी केली आहे. हे कुटील राजकारण सुरू असले तरी शिवसेनेच्या उमेदवारचा विजय निश्‍चित आहे, असा ठाम विश्‍वास आमदार उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला. 

नगराध्यक्ष पोटनिवडणुकीनिमित्त खासदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी उपस्थित होते. सामंत म्हणाले, ""शिवसेनेची प्रचार यंत्रणा शहरात जोरात राबत आहे. कॉर्नर सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पंधरा प्रभागापैकी पहिल्या पाच ते सात प्रभागामध्येच विजय होणार; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांना शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याची कल्पना नाही. त्यांची दिशाभूल करून उमेदवारी दिली आहे. काही विशिष्ठ मतदार मिळविण्यासाठी भाजपने सुपारी देऊन घड्याळ निशाणीचा उमेदवार दिला आहे. मात्र शिवसेनेवर प्रेम करणारा मोठा मुस्लिम वर्ग आहे. 80 टक्के मुस्लिम मतदार सेनेच्या बरोबर राहिल.'' 

हेही वाचा - नारायण राणेंचा सावंतवाडी नगरपालिकेसाठी हा डाव 

शिकलेल्यांनी बिनविरोध निवडणूक करायची

भ्रष्टाचाराच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. भ्रष्टाचार शाबित झाला तर नगराध्यक्ष निवडणूक लढणार नाही. सिद्ध झाला नाही, तर आरोप करणाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. माझ्यावरही वैयक्तिक टीका झाली; मात्र विकास करणाऱ्यांच्या मागेच मतदार राहातात. आम्ही लादलेली निवडणूक, असा प्रचार केला जात आहे. परंतु नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यावर निवडणूक होणारच. एवढा पुळका होता, तर शिकलेल्यांनी बिनविरोध निवडणूक करायची होती, असा टोलाही सामंत यांनी हाणला. पाणी योजना लवकर पूर्ण करून शहरातील रस्ते चकाचक केले जातील. अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून रत्नागिरीची ओळख असेल, असे सामंत म्हणाले. 

हेही वाचा - संभाजी भिडे म्हणाले, कोण सांगितले मला पुणे जिल्हा बंदी... 

जागृत मतदार फसणार नाही! 

उद्या रत्नागिरीत पाणी येणार नाही, मात्र आम्हाला निवडून दिल्यास अशी वेळ नागरिकांवर येणार नाही, असा भाजपचा प्रचार सुरू आहे. याबाबत उदय सामंत म्हणाले, ""खोट बोलुन रत्नागिरीतील जागृत मतदार मतदान करणार नाही. तो फसणार नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Candidate Promoted By BJP In City President Election Ratnagiri Marathi News