'फोडाफोडी करणारी आघाडी कसली?' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

नुकतेच कुणकेश्‍वर येथे शिवसेनेने पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यावर राष्ट्रवादी पक्षाने तीव्र नापसंती दर्शवत नाराजी व्यक्‍त केली.

देवगड - पक्ष वाढीसाठी कोणीही प्रयत्न करण्यास हरकत नाही; मात्र राज्यात आघाडी शासन सत्तेवर असताना मित्रपक्षाचेच कार्यकर्ते फोडण्यात कसली आघाडी? राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवू नये असे यापूर्वी सांगूनही कुणकेश्‍वर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शिवसेनेने याला हरताळ फासल्याची संतप्त प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे येथील ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांनी व्यक्‍त केली. याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नुकतेच कुणकेश्‍वर येथे शिवसेनेने पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यावर राष्ट्रवादी पक्षाने तीव्र नापसंती दर्शवत नाराजी व्यक्‍त केली. याबाबत आज येथील पक्ष कार्यालयात तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची घाटे यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. यावेळी नंदकुमार घाटे यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, माजी युवक जिल्हाध्यक्ष अभय बापट, विनायक जोईल, शरद शिंदे, दिवाकर परब, नागेश आचरेकर, सुमंत वाडेकर, पद्‌माकर राऊत आदी उपस्थित होते. श्री. घाटे म्हणाले, ""विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यानंतर राज्यात आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करण्यावरून मतभेद दिसून आले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापूढे मित्रपक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट केले होते; मात्र असे असताना तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथे पात्रकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांच्या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करून नेतृत्वाचे याकडे निश्‍चितच लक्ष वेधणार आहे. त्यामुळे आघाडीतील घटकपक्ष असलेल्या दोन्ही मित्रपक्षांनी याची काळजी घेण्याचे आवाहन श्री. घाटे यांनी केले आहे. आरोग्याचे प्रश्‍न, वीजेचे प्रश्‍न सोडवण्याची आवश्‍यकता आहे.'' 

हे पण वाचा...अन्यथा साखर वाहतूक रोखून पैसे वसूल करू ; राजू शेट्टी यांचा इशारा 

 ...मग पक्ष जरूर वाढवा 
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर स्थानिक खासदार, पालकमंत्री यांना आमची नेहमीच सहकार्याची भावना राहिली आहे. त्यामुळे त्यांनीही पक्षप्रवेश घेताना याची काळजी घेणे आवश्‍यक होते. पक्ष जरूर वाढवा; मात्र मित्रपक्षांचे कार्यकर्ते घेता नये, असा सल्ला नंदकुमार घाटे यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला. 

हे पण वाचा - राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आधीच फेटाळण्याचं फिक्स; मुश्रीफांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader nandkumar ghate criticism on shiv sena