...अन्यथा साखर वाहतूक रोखून पैसे वसूल करू ; राजू शेट्टी यांचा इशारा 

raju shetty speech in jaysingpur us parishad
raju shetty speech in jaysingpur us parishad

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल विनाकपात एकरकमी  एफआरपी देण्यात यावी. 
या बरोबरच तोडणी वाहतुकीमध्ये 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना एकूण एफआरपीच्या 14 टक्के
प्रमाणे होणारी 200 रुपये वाढ हंगाम संपल्यानंतर तातडीने देण्यात यावी. अन्यथा साखर वाहतूक रोखून पैसे वसूल करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान एक रकमी एफआरपी जाहीर करणाऱ्या कारखान्याचा गाळप हंगाम विना अडथळा सुरू होण्याचा मार्ग रिकामा झाला. जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये १९ वी ऊस परिषद आॅनलाईल पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

कारखानदारांनी ही एफआरपी एक रकमी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी. हा नियम संपूर्ण राज्यभर लागू लागू करण्यात यावा. एक रकमी एफआरपीसह १४ टक्के वाढीव दर देण्यात यावा, अशी मागणी करून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे ठरावही यावेळी करण्यात आले. 


ऊस परिषदेत करण्यात आलेले ठराव
ज्या साखर कारखान्यांनी अद्याप 2019-20 सालची एफआरपी दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालकावर त्वरीत  फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात टाकावे. तसेच राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी साखरेवरील कर्जस्वरूपातील उचल 90 टक्के देण्यात यावी.

2) राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवून शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.  राज्य शासनाने केवळ हेक्टरी 10 हजार रूपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. ही नुकसान भरपाई सरसकट प्रति हेक्टरी 25 हजार रूपये करण्यात यावी. 

3) शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरीत रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा 12 तास वीज देण्यात यावे. तसेच प्रलंबित वीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देणेत यावे. तसेच लघुदाब मोटारीसाठी लिफ्ट इरिगेशनचा विजेचा दर 1.16 रूपये प्रति युनिट प्रमाणे आकारणी करण्यात यावी.  

4) लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिलात राज्य सरकारने अद्याप कोणतीही सवलत दिलेली नाही.लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करण्यात यावे. तसेच वाढीव वीज दर कमी करण्यात यावे. 

5) केंद्र सरकारने खासगी उद्योगांना चालना देण्यासाठी शेतीची बाजारपेठ खुली केली असल्याचे जाहीर करून तीन नवीन कृषि कायदे अस्तित्वात आणले. मात्र या कंपन्यांना शेतकर्‍यांचा शेतीमाल खरेदी करताना एमएसपीच्या हमीभावाने खरेदी  करण्याचे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेला हा कायदा शेतकर्‍यांना खाईत घालणारा आहे. हा कायदा त्वरीत रद्दबातल करून एमएसपी कायदेशिररित्या बंधनकारक करून नव्याने कायदा अस्तित्वात आणावा. 

6) पर्यावरणाच्या नुकसानीमुळे महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ इ. नैसर्गिक आपत्तीने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. याचा फटका हा शेतकर्‍यांनाच बसत असतो. जागतिकस्तरावर कार्बन क्रेडिटच्या धर्तीवर आपत्ती निवारण फंडाची निर्मिती करण्यात यावी. ज्यांनी पर्यावरणाचे नुकसान केले आहे, त्यांच्याकडून दंड वसूल करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. 


7) केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत ३५ रूपये करावी. तसेच केंद्रसरकारकडून थकीत निर्यात अनुदानाचे ६३०० कोटी रूपये त्वरित कारखान्यांना द्यावे. 

8) सन २०२० -२१ या सालाकरिता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल १५०० रूपये करून ७५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.

9) ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सन 2020-21 या चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी. तसेच तोडणी वाहतुकीमध्ये 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  शेतकर्‍यांना एकूण एफआरपीच्या 14 टक्के वाढ हंगाम संपल्यानंतर देण्यात यावे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com