गर्दी न करता शेतीत काम करण्याचा यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना या संकटाचा सर्वाधिक फटका सध्या शेतकरी वर्गाला बसत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाचे 20 ते 25 टक्के तर काजू पिकाचे 30 टक्के एवढेच पीक आले आहे. त्यात काजूला 80 रुपये एवढा कमी दर मिळत आहे.

वेंगुर्ले ( सिंधुुदुर्ग ) - कोरोना या साथरोगाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो कोरोना रूग्ण आढळला होता त्याचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आहे आहेत.

सध्या अगोदरच आंबा व काजूवर आलेले संकट व त्यानंतर या कोरोना विषाणूमुळे बाजारपेठांरील संकट आणि या पिकांना मिळणारा भाव लक्षात घेता पुढील काळ हा शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी खूप कठीण असणार आहे. घरात बसणे म्हणजे उपाशी मरणे नसून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःचे रक्षण करून माझा मीच रक्षक याचा अवलंब करावा व गर्दी न करता एक एकट्याने शेतात जाऊन काम करावे, असे आवाहन कृषीभूषण तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी केले आहे. 

कोरोना या संकटाचा सर्वाधिक फटका सध्या शेतकरी वर्गाला बसत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाचे 20 ते 25 टक्के तर काजू पिकाचे 30 टक्के एवढेच पीक आले आहे. त्यात काजूला 80 रुपये एवढा कमी दर मिळत आहे. तर आंबेसुद्धा कमी किमतीला विकले जात आहेत. यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांवर येणारे संकट लक्षात घेता. शेतकऱ्यांनी न घाबरता शासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःचे स्वतः रक्षण करावे. शेतीची कामे करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा अवलंब करावा. दुध डेअरीमध्येही गर्दी करू नये. 

पावसाळ्यात कोकणातील शेतकऱ्यांचे भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून फक्त 80 रूपये गुंठा एवढी नुकसान भरपाई मिळाली. काही शेतकऱ्यांना त्यापासून सुद्धा वंचित राहावे लागले. आता थोडेफार आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी हे तीन महिने महत्वाचे होते; मात्र यातही या कोरोना संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

लॉक डाउनलोड संपल्यानंतर निश्‍चितच माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या शेतकऱ्यांसाठी योग्य पावले उचलतील; मात्र तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याने माझा मीच रक्षकचा अवलंब करावा. पोलिसांनीही कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तो नागरिक, शेतकरी कशासाठी घराबाहेर पडला याची खातरजमा करून नंतरच कारवाई करावी. 
- एम. के. गावडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP M K Gavade Advice On Corona To Farmers