दोडामार्ग रूग्णालयाला राष्ट्रवादीचा घेराओ 

प्रभाकर धुरी
Thursday, 15 October 2020

रुग्णालयात दोन पैकी सध्या एकच रुग्णवाहिका कार्यरत आहे. दुसरी रुग्णवाहिका गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत आहे.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - येथील ग्रामीण रुग्णालयातील गेल्या कित्येक महिन्यांपासून बंदावस्थेत असलेल्या रुग्णवाहिकेसह रुग्णालयाशी निगडित अनेक समस्यांवर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. 

तालुक्‍यात अनेक ठिकाणी अद्यापही कोविडचे रुग्ण सापडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन तेथील प्रभारी सहायक अधीक्षक आशिष नाईक यांना विचारणा केली. रुग्णालयात दोन पैकी सध्या एकच रुग्णवाहिका कार्यरत आहे. दुसरी रुग्णवाहिका गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत आहे.

दुरुस्तीसाठी ती पर्वरी गोवा येथील शोरूममध्ये आहे. ती रुग्णवाहिका रुग्णालयाच्या सेवेत नेमकी कधी दाखल होणार असा सवाल यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला. तेव्हा श्री. नाईक यांनी तत्काळ शोरूममध्ये फोन केला आणि दोन दिवसात रुग्णवाहिका मिळेल असे सांगितले. रूग्णवाहिकेवर कार्यरत चालक जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मानधन तत्त्वावर देण्यात आला आहे. त्यात बदल करून कायमस्वरूपी चालक देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. 

यावेळी तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, शहराध्यक्ष सुदेश तुळस्कर, माजी सरपंच प्रदीप चांदेलकर, संदेश वरक, अभिनाथ गवस, उल्हास नाईक, सुशांत राऊत आदी उपस्थित होते. 

बांधकामची टाळाटाळ 
सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून मानधन नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. याकडे लक्ष वेधताच शासनाकडूनच मानधनाचे पैसे आले नसल्याचे नाईक यांनी सांगितले. रूग्णालय कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या खोल्यांमध्ये गळती आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार झाला असून मात्र पुढील कार्यवाही करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे श्री. नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP surrounds Dodamarg Hospital