अखेर दोन महिन्यांनी गुहागरमध्ये त्याने केलीच एंट्री...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नागरिकांत अस्वस्थता; वरचापाट मोहल्ल्यातील एकाचा मृत्यू 

गुहागर (रत्नागिरी)  : मोडकाआगर पूल बंद असणे हे गुहागर शहरवासीयांसाठी त्रासदायक ठरले होते. मात्र, आज गुहागर शहरातील दोन व्यक्ती बाधित असल्याचे समोर आले. तसेच वरचापाट मोहल्लातील एका व्यक्तीचा तापाने मृत्यू झाला. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. नगरपंचायतीने या वृत्ताची दखल घेत शहरात फवारणी सुरू केली आहे. 

मोडकाआगर धरणावरील पुलाचे काम सुरू केल्यामुळे एप्रिल महिन्यापासून गुहागर-श्रूंगारतळीचा रस्ता बंद आहे. हा रस्ता बंद झाल्याने श्रूंगारतळीला जायचे असेल तर 22 कि.मी.चा वळसा घालून जावे लागते. वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने या मार्गावरील रहादारी निम्म्याने घटली आहे. परिणामी शृंगारतळी, जानवळे, चिखली परिसरात रुग्णांची संख्या वाढत असतानाही गुहागर शहर सुरक्षित होते. त्यामुळे रस्ता बंद असणे ही शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, श्रृंगारतळीतील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी गुहागरमध्ये उपचारासाठी आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या गुहागरमधील काहीजणांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठविले होते.

हेही वाचा -  नांदगावात यंत्रणा खडबडून जागी, पोलिसही तैनात

31 जुलैला आलेल्या अहवालात या व्यक्तींपैकी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. त्यातच वरचापाट मोहल्ल्यातील एकाचा 1 ऑगस्टला सकाळी मृत्यू झाला. या व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे मोहल्ल्यातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. सदर व्यक्तीच्या घरात केवळ त्यांची पत्नी राहते. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. 1 ऑगस्टला या दोन्ही घटनांची माहिती शहरात पसरली. 

हेही वाचा - साडेसात एकर जमीन नापीक, भरपाईची प्रतीक्षा, जाणून घ्या नेमक प्रकरण काय
 
6 गावांतील 9 व्यक्ती पॉझिटिव्ह  

ग्रामीण रुग्णालयातून पाठविलेल्या 48 स्वॅबचा तपासणी अहवाल 31 जुलैला रात्री प्राप्त झाला. या अहवालात 6 गावांतील 9 व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यामध्ये जानवळे - 3, पालशेत - 1, श्रूंगारतळी - 1, देवघर - 1, गुहागर - 2 आणि पडवेतील एका व्यक्ताचा समावेश आहे. पडवे मोहल्लामधील 8 व्यक्ती 15 दिवसांच्या कालावधीमध्ये मृत पावल्या. त्यांच्या नातेवाईकांपैकी 7 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी एक व्यक्ती बाधित आहे.

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 9 covid patients 6 villege found in guhagar - ratnagiri