esakal | महामार्गाच्या नव्या सीमांकनामुळे संभ्रम 

बोलून बातमी शोधा

new demarcation highway Confusion konkan sidhudurg}

सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची अधिसूचना निघाल्यानंतर 2015 मध्ये जिल्ह्यात मोनार्च कंपनीकडून चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या आवश्‍यक जागेची निश्‍चिती करण्यात आली. यात महामार्ग दुतर्फा प्रत्येक 100 मिटर अंतरावर पिवळ्या रंगाचे नीस उभारण्यात आले.

kokan
महामार्गाच्या नव्या सीमांकनामुळे संभ्रम 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग)-  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रारंभी सीमा निश्‍चिती करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना आता पुन्हा पांढरे नीस मारून हायवेची हद्द निश्‍चित केली जात आहे; मात्र यापूर्वी सीमा निश्‍चितीकरणासाठी उभारलेले नीस आणि आता नव्याने रोवण्यात येत असलेले पांढऱ्या रंगाचे नीस यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आहे. त्यामुळे महामार्गाच्या या नव्या सीमांकनाबाबत नागरिक संभ्रमात आहेत. 

सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची अधिसूचना निघाल्यानंतर 2015 मध्ये जिल्ह्यात मोनार्च कंपनीकडून चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या आवश्‍यक जागेची निश्‍चिती करण्यात आली. यात महामार्ग दुतर्फा प्रत्येक 100 मिटर अंतरावर पिवळ्या रंगाचे नीस उभारण्यात आले. यात शहरांच्या ठिकाणी 45 मिटर तर ग्रामीण भागात 60 मिटरचे भूसंपादन करण्यात आले. त्यानंतर चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. चौपदरीकरणाच्या दोन्ही मार्गिकांचे 95 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. 

चौपदरीकरण पूर्णत्वास जात असताना महामार्ग विभागाने निश्‍चित केलेल्या सीमांकनाबाहेर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी, स्थानिक जमीन मालकांनी तसेच हायवे बाधितांनी छोटी मोठी दुकाने व इतर व्यवसाय सुरू केले आहेत. तर अनेक प्रकल्प बाधितांकडून नव्याने बांधकामे केली जात आहेत. आठ दिवसांपासून महामार्गालगत पुन्हा हायवे ठेकेदार डीबीएल कंपनीकडून सीमांकनाचे काम सुरू केले आहे. यात प्रत्येक 100 मिटरला पांढरे रंगाचे नीस उभारले जात आहेत; मात्र हे नवे नीस अनेक ठिकाणी जुन्या नीसापेक्षा मागे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वी पेक्षा आणखी जागेचे संपादन होणार का? नव्या सीमांकनात येणारी बांधकामे हटवावी लागणार का? असाही प्रश्‍न प्रकल्पबाधितांना पडला आहे. 

चौपदरीकरणात कलमठ ते झाराप दरम्यान जेवढ्या तातडीने सीमांकनाचे काम केले जात आहे. तेवढीच तत्परता महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग विभागाने कणकवलीत दाखवायला हवी. शहरात स्टेट बॅंक ते तेलीआळी डीपीरोड दरम्यान महामार्ग अरुंद असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. तसेच महामार्ग दुतर्फा अनधिकृत बांधकामेही वाढली आहेत. 
- बाळू मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ता 

चौपदरीकरण सीमा निश्‍चित करताना अनेक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे नीस रोवल्याच्या तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींचे निराकरण करत असून, पूर्वीच्या सीमांकनापेक्षा अधिक अंतरावर टाकलेले नीस काढण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. 
-गणेश महाजन, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

संपादन - राहुल पाटील