कोकणात अनोखा कोंगळे पॅटर्न ; गटशेतीतून होतंय बियाणांच उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

कर्जत २ या भात बियाण्याची शेती करून चांगला नफा कमवला आहे.

दाभोळ : दापोली तालुक्‍यातील कोंगळे गावातील शेतकऱ्यांनी गटशेती करून शेतकऱ्यांची भरभराट कशी होऊ शकते, याचा प्रत्यय दिला आहे. कर्जत २ या भात बियाण्याची शेती करून चांगला नफा कमवला आहे. शासन १ हजार ६०० रुपये क्‍विंटल भावाने भाताची खरेदी करते; मात्र कृषी विद्यापीठ कर्जत २ हे भाताचे बियाणे २ हजार ४०० रुपये क्‍विंटल भावाने खरेदी करणार आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत एका क्‍लिकवर होणार कारवाई ; आरटीओंना मिळाले ई-चलन मशिन

कृषी सहाय्यकाने शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन केल्याने हे शक्‍य झाले. दापोली तालुक्‍यातील आंजर्ले खाडीच्या एका बाजूला असलेले कोंगळे हे दुर्गम गाव. गावात १५० घरे. चार वर्षांपूर्वी माधव शिंदे हे कृषी सहाय्यक येथे आले. त्यांनी शेतकऱ्यांची मानसिकता बदलल्याने २७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ५ एकर जागेत कोकण कृषी विद्यापीठासाठी ग्रामबीजोत्पादन प्रकल्प राबविला.

कर्जत २ जातीचे २५० किलो भाताचे बियाणे पेरले. सध्या हे भात तयार झाले. या लागवडीसाठी गावातील शेतकऱ्यांची शेते भाड्याने घेतली आहेत. भात लागवडीसाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. कर्जत २ लागवडीसाठी शेतीशाळा घेतली, भातावर पडणाऱ्या किडी कशा ओळखायच्या, या किडींचा नाश करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, याची माहितीही दिली. मुंबईत असलेले आमचे गावकरी यावर्षी गावात होते. त्यांनीही आम्हाला मदत केली. 

या प्रकल्पात महादेव साळवी, महेश साळवी, सुवर्णा रेवाळे, मेधा साळवी, दिनेश मोहिते, अंकिता साळवी, चंद्रभागा साळवी, सविता साळवी, रामचंद्र बाईत, हर्षाली मोहिते, पांडुरंग रेवाळे, चंद्रकांत साळवी, आनंदी मोहिते, लक्ष्मण रेवाळे, अनिता रेवाळे, निकिता साळवी, अशोक रेवाळे, उत्तम साळवी, अक्षता साळवी, तुकाराम साळवी, प्रकार साळवी, हरिश्‍चंद्र साळवी, सुभाष रेवाळे, साक्षी साळवी, सलोनी साळवी, अपर्णा साळवी, काशिनाथ साळवी हे सहभागी झाले. 

हेही वाचा - काळबादेवी किनारी स्टारफिश ; प्रजननासाठी खडकाळ किनारी -

‘कोकण सदाबहार’ बियाण्याची लागवड 

गेल्या वर्षी कृषी विद्यापीठातील संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. अरुण माने यांनी चवळीसाठी ग्रामबीजोत्पादन प्रकल्प राबवण्यासाठी विचारले असता, महादेव साळवी यांच्या नेतृत्वाखाली २७ शेतकऱ्यांनी १२ किलो चवळीच्या ‘कोकण सदाबहार’ या बियाण्याची लागवड केली. कृषी विद्यापीठाने १०० किलो चवळी बियाणे विकत घेतल्याने चांगला आर्थिक लाभ झाला. यावर्षी बियाणे विकणार, असे उत्तम साळवी यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new pattern of framing is in kokan that kongale pattern which is helpful to farmers in ratnagiri