esakal | ग्रामपंचायत प्रशासनाला न्हावेलीवासीयांचे समर्थन 
sakal

बोलून बातमी शोधा

Nhaveli residents support Gramsevak konkan sindhudurg

न्हावेली येथील ग्रामस्थ आणि महिलांनी यासंदर्भातील निवेदन पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनाही दिले.

ग्रामपंचायत प्रशासनाला न्हावेलीवासीयांचे समर्थन 

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - न्हावेलीत एका ग्रामस्थाने ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक तृप्ती राणे यांच्यावर वेळेत उपस्थित न राहणे व मनमानी कारभाराचे केलेले आरोप चुकीचे आहेत, असा दावा ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देवून केला. संबंधितांकडून तक्रारी सुरूच राहिल्यास ग्रामस्थांकडून अनुचित प्रकार घडू शकतो आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील त्यासाठी योग्य न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिला. 
न्हावेली येथील ग्रामस्थ आणि महिलांनी यासंदर्भातील निवेदन पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनाही दिले.

या निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. यामध्ये म्हटले आहे, की गावातील एका ग्रामस्थाने गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेविका तृप्ती राणे यांच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी संदर्भात अर्ज दाखल केला आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे. संबंधितांनी यापूर्वीही बऱ्याचदा न्हावेली ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. अपिलीय सुनावणी झाली; पण त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी केलेले यापूर्वीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे निदर्शनास आले. मुळात एकाही ग्रामसभेला उपस्थित न राहता 2014 पासून गावात कोणतेही विकासकाम आल्यास त्याला विरोध करणे हे त्याचे नित्याचेच आहे.

न्हावेली गोमेवाडी ते रेवेवाडी रस्त्यावर टाकलेली खडी संदर्भात तक्रार करून काम बंद पाडले व ते काम रद्द झाले. अद्याप या रस्त्याचे काम झालेले नाही. अशा प्रकारच्या तक्रारीही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे तक्रार अर्ज दाखल करून अडथळे निर्माण करणे व सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणे असे ते करीत आहेत. ग्रामसेविका तृप्ती राणे यांनी गावात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कालावधीमध्ये संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार ग्रामस्वच्छता अभियान तसेच स्मार्ट ग्राम पुरस्कार, असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. 

हे निवेदन देताना हेमचंद्र सावळ, संजय दळवी, शरद धाऊसकर, भिवा नाईक, रामचंद्र परब, लक्ष्मण धाऊसकर, आरती परब, जयश्री नाईक, विशाल गावडे, रवींद्र मांजरेकर, सानिया हरमलकर, सुदर्शना मांजरेकर, प्रसाद मांजरेकर, दिया हरमलकर, संजना कोचरेकर, लक्ष्मी कोचरेकर, कल्पना कोचरेकर, सायली न्हावेलकर आदी उपस्थित होते. 

संबंधिताला हद्दपार करण्याची मागणी 
निवेदनात म्हटले आहे, की भविष्यात विकासकामासंदर्भात अशाच तक्रारी होत राहिल्यास ग्रामस्थांना कायदा-सुव्यवस्था हातात घेऊन अनुचित प्रकार करण्यास भाग पडावे लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. त्यामुळे ग्रामस्थांनी कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ नये, यासाठी संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्याची तरतूद करावी. त्यासाठी प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यास ग्रामस्थ तयार आहेत. ग्रामस्थांना योग्य न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांच्यावतीनेही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 

संपादन - राहुल पाटील

loading image