राऊतांविरोधात खंबाटा भ्रष्टाचार अस्त्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा असल्याचे नीलेश राणेंनी सांगितले.

रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा असल्याचे नीलेश राणेंनी सांगितले.

रत्नागितील पत्रकार परिषदेत खंबाटातील बाधित कामगारांसह नीलेश राणेंनी राऊतांना लक्ष्य केले. यावेळी खंबाटा भ्रष्टाचाराविषयी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचीही क्‍लिप दाखविली. कामगारांतर्फे सुनील तळेकर म्हणाले, की खंबाटा बंद होऊन अडीच वर्षे झाली; मात्र शिवसेनेच्या कामगार सेनेने पाठपुरावाच केला नाही. युनियनचे नेतृत्व राऊतांकडे होते.

त्यांच्यामुळेच २,७६३ कामगार आणि त्यांची कुटुंबे असे सुमारे बारा हजार लोक देशोधडीला लागले. ही कंपनी मॅनेजमेंटच्या संगनमताने बंद झाली. तीन वर्षांचा पगार, बोनस, ग्रॅच्युइटीही मिळाली नाही. यात पन्नास टक्‍केहून अधिक कामगार कोकणातील आहेत. याला जबाबदार राऊतांना मते मागण्याचाही अधिकार नाही. न्यायासाठी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो, पण त्यांनीही वाटेला लावले.

कंपनी बंद पाडण्यामध्येही मोठा भ्रष्टाचार आहे, असा संशय कामगार विश्‍वनाथ दळवींनी व्यक्‍त केला. कंपनीचे मालक परदेशात असतात. आमची बाजू खासदार राऊतांनी संसदेत मांडायला हवी होती. पण बंद कंपनीच्या जागी बर्ड एव्हिएशन कंपनी आणली. त्यावरही कामगार सेनेचे वर्चस्व आहे.

राऊतांच्या जवळच्या काही मंडळींना तेथे नोकरी दिली गेली. खंबाटाकडील एक धनादेश राऊतांच्या संस्थेला दिला. या खंबाटावर मातोश्रीच्या काही कामगारांचे, शाखाप्रमुखांचे पगार दिले जात होते. हे प्रकरण अंजली दमानियांनी बाहेर काढले. कामगारांच्या वेतनातील तिसऱ्या हप्त्याचा धनादेश राऊतांकडे गेल्याचा आरोप करण्यात आला.

घर विकले
खंबाटामधील नोकरीच्या जिवावर मुलीला सायन्सला प्रवेश घेतला. नोकरी गेल्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी घर विकले. आता आमच्यावर भाड्याने राहायची वेळ आली आहे, अशी व्यथा संदीप मोरे यांनी मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane comment