हातखंबा येथे घडलेला प्रकार हा माझ्याविरोधात रचलेला कट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

रत्नागिरी - हातखंबा येथे घडलेला प्रकार हा माझ्याविरोधात रचलेला कट आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे हे सामंतांच्या इशाऱ्यावरून कारवाई करत आहेत, असा आरोप नीलेश राणेंनी केला.

रत्नागिरी - हातखंबा येथे घडलेला प्रकार हा माझ्याविरोधात रचलेला कट आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे हे सामंतांच्या इशाऱ्यावरून कारवाई करत आहेत, असा आरोप नीलेश राणेंनी केला. सामंतांना एक आणि राणेंना एक न्याय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली करा, अशी तक्रारही निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे राणे यांनी सांगितले.

शासकीय कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणावर राणें पत्रकार परिषदेत म्हणाले, राजापुरातील कार्यक्रम संपवून परतताना हातखंबा चेकनाक्‍यावर पोलिसांनी थांबवले. शिवसेनेचा कार्यकर्ता बाबू म्हाप तिथे आला आणि डोकावून बघू लागला. मला संशय आला म्हणून मी त्याला विचारणा केली. तेथे म्हापबरोबर बाचाबाची झाली. तो गाडीजवळ आला नसता, तर हा प्रकार घडला नसता. मी उमेदवार असल्यामुळे मला बाद करण्यासाठी तो काहीतरी करू शकतो या संशयातून त्याला हटकले. हा कट असून मला त्यात अडकवण्याचा प्रयत्न होता. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहे. 

मी पोलिसांना विचारले, ‘विनायक राऊतांच्या आठ ते दहा गाड्या जातात, तेव्हा त्या तपासता की सत्तेचा दुुरुपयोग होतो.’ ही शिवीगाळ करणे आहे का. या गोष्टी निवडणूक विभागातील कॅमेरात आहेत. तशी क्‍लिप मला दाखवावी. मी म्हाप याच्याशी बोललो, तरीही इंगळेंनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना सामंतांनी केलेले गुन्हे दिसत नाहीत; मात्र आमच्यावर गुन्हे दाखल. एक पोलिस अधिकारी धुडगूस घालून अशाप्रकारे एकतर्फी कारवाई करत आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिस आणि अण्णा सामंत यांच्या चालकात बाचाबाची झाली. अण्णांवर कारवाई अपेक्षित नाही. पण वाद घालणाऱ्या चालकाचे काय, त्यानंतर प्रवेशद्वारावर धुडगूस घालणारे किरण सामंत आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला नाही. हातखंबा येथील परिस्थिती आणि तो प्रसंग समान होता. तेव्हा इंगळेंनी कारवाई केली नाही. यावरून सामंत-इंगळे यांचे व्यवहार आहेत का, असा प्रश्‍न पडतो. रत्नागिरी शहरातील भाजीवाल्यांचे प्रकरण मिटत असतानाही याच डीवायएसपींनी कारवाईचा बडगा उगारला. 

आचारसंहितेचा त्रास
आचारसंहितेचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करेन. पोलिसांचा त्रास सिंधुदुर्ग किंवा रायगडमध्ये होत नाही. फक्‍त रत्नागिरीतच. यामागे पोलिसांनाच काहीतरी घडवायचे आहे, असा संशय नीलेश यांनी व्यक्‍त केला.

कारवाई झाली ती कायद्याने : इंगळे 
नीलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे म्हणाले, की जी कारवाई झाली ती कायद्याने झाली आहे. यावर न्यायालय योग्य तो निर्णय देईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane comment