'कोकणवासीय नाराज ; शिवसेना म्हणजे बोगस कंपनी'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

आताच्या निकालाप्रमाणेच पुढे होणाऱ्या निवडणुकीतही परिवर्तन दिसेल

रत्नागिरी : शिवसेनेचा कोकणातील कारभार भकास आहे. कोकण पॅकेज नाही, निसर्ग वादळातली अजून मदत मिळाली नाही, गाळ काढायला ड्रेझर नाही, कोणताही नवा व्यवसाय नाही, जमीन घोटाळ्यात यांचीच नावे आली. वर्षभरापूर्वी सांगितलेला गणपतीपुळे आराखडा अजून झालेला नाही. सेना म्हणजे बोगस कंपनी. त्यामुळे सेनेवर कोकणवासीय नाराज आहेत. आताच्या निकालाप्रमाणेच पुढे होणाऱ्या निवडणुकीतही परिवर्तन दिसेल, असा विश्‍वास माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला.भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चिपी विमानतळसंदर्भात ते म्हणाले की, नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचा आराखडा बनवल्याप्रमाणेच त्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोनवेळा विमानतळाचे उद्‌घाटन झाले, पण नंतर विमान काही दिसले नाही. त्यासाठी सर्व खात्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, विमान कंपन्यांशी करार करावा लागतो, हे ठाकरे सरकारला माहितच नाही. उद्‌घाटनाच्या फक्त तारखा जाहीर होत आहेत. राणेंच्या पुढाकाराने याचे उद्‌घाटन होईल.

हेही वाचा - भरवस्तीमध्ये झालेल्या या धाडसी चोरीने शहरात खळबळ माजली आहे

रत्नागिरीतले आमदार जिल्ह्याच्या विकासासाठी काही मागतच नाहीत. ते फक्त स्वतःचे बघतात. सिंधुदुर्गचे पालकमंत्री सामंत हे आणखी एखादे मंत्रिपद मिळते का, हे बघत असतात. रत्नागिरीचे पालकमंत्री परब कलानगरमध्ये असतात आणि केबल नेटवर्कचा पैसा मोजत असतात. त्यांना रत्नागिरीच्या विकासाचे काही पडलेले नाही. मराठा समाजाचे नेते कलानगरच्या प्रवेशद्वारावर ताटकळत होते, पण परबांनी वेळच दिली नाही, अशी टीका राणे यांनी केली.

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticise on the topic of chipi airport to shivsena in ratnagiri