लेखणीत रमणारे हात राबले शेतात अन् कष्टाने फुलविलेले सृजनाचे मळे ; थक्क करणारा 'तिचा' प्रेरणादायी प्रवास 

राजेश कळंबटे
Thursday, 22 October 2020

प्रगतिशील शेतकर्‍याच्या हातात हात घालून शेतीत रमली, नुसती रमली नाही तर लाल मातीत रूजली.

रत्नागिरी - एमपीएससीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशाकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणारी टिपिकल पुणेरी तरुणी कोकणातील दुर्गम भागात आली. प्रगतिशील शेतकर्‍याच्या हातात हात घालून शेतीत रमली, नुसती रमली नाही तर लाल मातीत रूजली. एखाद्या चित्रपटाला साजेशी ही कथा पूर्वाश्रमीच्या सुवर्णा गोडबोले आणि आजच्या सुवर्णा वैद्य यांची. 

रत्नागिरी तालुक्यातील रिळ या गावात गेली पंधरा वर्षे त्या भातशेती, भाजीपाला लागवडीसह आंबा ऊत्पादनात रमल्या आहेत. 

सुवर्णा बारावीला बोर्डात सातव्या तर पदवीला राज्यशास्त्रात महाराष्ट्रात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. पीएचडीची इच्छा होती पण डॉ. अविनाश धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून प्रशासकीय सेवेचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तयारी सुरू असतानाच रिळ येथील प्रगतिशील शेतकरी मिलिंद वैद्य यांच्या कष्टाळूपणा, जिद्दीने प्रभावित झालेल्या सुवर्णा रीळकर झाल्या.

लेखणीत रमणारे हात चूल पेटवणे, सारवण करणे, दूध काढणे यांसह आंबा सॉर्टींगसारख्या कामात व्यस्त झाले. शेतीत प्रयोग करणार्‍या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या शेतात उतरल्या. ट्रॅक्टर, गांडूळ खत प्लान्ट शिवारात सुरू करतानाच गोबर गॅस, स्लरीची शेती, जैविक शेतीसाठीचा कंपोस्ट खड्डा, जमिनीची प्रत सुधारण्यासाठी जीवामृताचा वापर, नवनवीन बियाण्यांचा अभ्यास, लावणीच्या पद्धती यात त्या स्वतः पारंगत झाल्या आहेत. 
मिलिंद अनेक ठिकाणी मार्गदर्शनाला जातात त्या वेळी सगळी धुरा सुवर्णा यांच्यावरच असते. भातपिक स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मिलिंद यांचा सन्मान झाला. त्यात सुवर्णा यांचा वाटाही तेवढाच आहे. जागतिक स्तरावर उच्चांकी भात उत्पादन काढण्याची किमया साधताना वैद्य पती-पत्नींनी सेंद्रिय शेतीवर भर दिला.

नाना प्रयोग  

देशी गायीचे संगोपन, अझोला निर्मिती, कातळावरील चिरेखाणीत शेततळ करून आंबा लागवड, ड्रीप इरिगेशनचा वापर, गावठी बियाण्यांचे संवर्धन असे नाना प्रयोग सुरू आहेत. ओसाड जमिनीवर सूर्यफूल, भूईमूग, मका, मूग, नाचणी कुळीथ, उडीद, चवळी, अनेक वेगवेगळ्या भाज्यांची किफायतशीर लागवड केली. घरचे धान्य, घरच्या भाज्या, घरचे तेल हे सर्व करण्यात आणि खाण्यात मजा औरच असते असे सुवर्णा सांगतात.

हे पण वाचादेशाच्या माजी सैनिकाला अश्रू आवरणे झाले कठीण

शेतकरी म्हटलं की, आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमिनीकडे बघणारा, आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते. शेती खूप व्यापक आणि समृद्ध व्यवसाय आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन, भविष्यातील संधी याचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे सर्व अनुभवल्यानंतर शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे.

-सुवर्णा मिलिंद वैद्य, रिळ

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story to ratnagiri rele village suvarna vaidya