माजी खासदार नीलेश राणे यांची पालकमंत्री सामंत यांच्यावर कडक शब्दात टिका....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

पद जाण्याच्या भीतीने पडवेत लॅब नाही
नीलेश राणे ः पालकमंत्री सामंत यांच्यावर टिका

कुडाळ (सिंधुदुर्ग) : नारायण राणेंच्या पडवे येथील हॉस्पिटलला कोविड टेस्टिंग लॅबोरेटरी मिळाली तर मातोश्रीवरून आपले पालकमंत्रीपद जाणार या भीतीने उदय सामंत लॅब होवू देत नाही, असा आरोप माजी खासदार भाजप नेते नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. जे स्वतःचा मतदारसंघ सुधारू शकले नाही ते जिल्हा काय सुधारणार असा सवालही त्यांनी केला.

माजी खासदार राणे यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर  पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप पदाधिकारी आनंद शिरवलकर, विशाल परब, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ, नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, “कोरोनाचे मोठे संकट जिल्ह्यावर आहे. हे संकट संपताना दिसत नाही. आपला जिल्हा ग्रीन झोनवरून रेडझोनकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

हेही वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात 'या' ठिकाणी सापडले गुप्त धनाचे मडके... -

लॉकडाऊनच्या 45 दिवसानंतर चाकरमान्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या तपासण्या झाल्या; पण त्याचे अहवाल अद्याप नाही. एकूणच या कोरोना संकट कालावधीत पालकमंत्र्यांचा कुठेच अंकुश नाही. राज्य सरकारकडून इतर राज्यातील मजूरांंप्रमाणे आमच्या चाकरमान्यांचे लाड झाले नाहीत. ई-पासचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. 10 ते 15 हजाराचा रेट सुरु आहे. सर्वसामान्यांना हा पास मिळत नाही ही खेदाची बाब आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गाला बसला दूसरा धक्का : आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह ....

सध्या होम क्वारंंटाईन 85 हजार तर संस्थात्मक संख्या फक्त 200 आहेत. पालकमंत्री आपल्या रत्नागिरी मतदारसंघात एक साधे पीपीई कीट वाटप करू शकले नाहीत ते आपल्या जिल्ह्याला काय देणार ? ते  सिंधुदुर्ग जिल्हाची वाट लावत आहेत. ज्यांंची तपासणी झाली त्याचे पंधरा पंधरा दिवस रिपोर्ट मिळत नाहीत. लोकांच्या जीवांशी खेळू नका. कोरोनावर सरकारचे लक्षच नाही. हे  पालकमंत्री साधे एक कोटी रुपये लॅबोरेटरीसाठी आणू शकत नाहीत मग तुम्ही कसले पालकमंत्री ? उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण?”

हेही वाचा- सावरकरांकडून हातगाडीने स्वदेशी मालाची विक्री

श्री. राणे म्हणाले, “आपले दुर्देव की आपल्याला असा पालकमंत्री मिळाला. नारायण राणेंच्या हॉस्पीटलला कोविड टेस्टिंग लॅबोरेटरी मिळाली तर मातोश्रीवरून पालकमंत्रीपद जाणार या भीतीने उदय सामंत लॅब होऊ देणार नाही. आमची लॅब व सर्व स्टाफ सेवेसाठी मोफत देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आता आपल्याला स्वतःचे रक्षण स्वतःच  केले पाहिजे. राज्यशासन काहीही करू शकत नाही.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane press conference in sindhudurg