देशाला दिशा देण्यासाठी भाजपला गावागावांत पोचवा : राणे

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 28 November 2020

गावागावांत पक्षाचा विस्तार करण्याचे आवाहनही यानिमित्ताने त्यांनी केले.

देवगड (सिंधुदुर्ग) : विकासाला चालना देणारे आणि देशाला दिशा देणारे सरकार राज्यात आले पाहिजे. यासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचे मत भाजप नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी जामसंडे येथे व्यक्‍त केले. गावागावांत पक्षाचा विस्तार करण्याचे आवाहनही यानिमित्ताने त्यांनी केले.

जामसंडे येथील मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरच्या नलावडे सभागृहात भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण झाले. दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. शिबीरात राजन तेली यांच्यासह भाजप प्रदेश सचिव तथा माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, विलास हडकर, डॉ. मिलिंद कुळकर्णी, प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत आदींनी मार्गदर्शन केले. तर नीलेश राणे यांचेही मार्गदर्शन झाले. त्यावेळी त्यांनी पक्षीय विस्तार, कार्यकर्ता काम, नेतृत्वगुण याबरोबरच राज्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. यावेळी मंचावर भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम उपस्थित होते. 

हेही वाचा - उपचाराला जात असताना दोघांना वाटेतच गाठले मृत्यूने -

Advertising
Advertising

माजी आमदार ॲड. अजित गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संजय बांबुळकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, पंचायत समिती सभापती सुनील पारकर, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे, प्रकाश राणे, संदीप साटम, रवींद्र जोगल, प्रणाली माने, मंगेश लोके, संजीवनी बांबुळकर, योगेश चांदोस्कर आदींची उपस्थिती होती.

निष्ठेने काम, ही ओळख

राणे म्हणाले, राज्याला सर्वार्थाने विकासाच्या दिशेने नेणारे सरकार आवश्‍यक आहे. देश महासत्ता बनायचा असेल तर पक्षाची विचारधारा जनमानसापर्यंत पोचवली पाहिजे. भाजपचा कार्यकर्ता निष्ठेने काम करतो, अशी आजवरची ओळख आहे. कुठल्याही अमिषाला कार्यकर्ता बळी पडत नाही ही भाजपची ताकद आहे. त्यामुळे भविष्यात राज्याला विकासात्मक सरकार भाजप देऊ शकेल.

 

संपादन - स्नेहल कदम