कायद्याचा धाकच नाही! नेव्हीचे बनावट पत्र वापरून बिनधास्त दारू वाहतूक

नीलेश मोरजकर
Monday, 14 September 2020

पेडणे अबकारी अधिकारी सुरेखा गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहनदास गावकर, शांबा परब, सिद्धेश हरमलकर, रेमंड परेरा, स्वप्नेश नाईक व सूरज गावडे यांच्या पथकाने आज ही कारवाई केली.

बांदा (सिंधुदुर्ग) - पत्रादेवी चेक नाक्‍यावर नेव्ही विभागाचे बनावट पत्र घेऊन पत्रादेवीमार्गे पुणेकडे जाणाऱ्या टेम्पोत सुमारे 9 लाखांपेक्षा जास्त किमतीची दारू गोवा अबकारी विभागाने जप्त केली. अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असताना वाहन चालक जंगलात धूम ठोकत पसार होण्यात यशस्वी झाला. दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या कंटेनर सुमारे 11 लाख व 9 लाखांची दारू, असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पेडणे अबकारी अधिकारी सुरेखा गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहनदास गावकर, शांबा परब, सिद्धेश हरमलकर, रेमंड परेरा, स्वप्नेश नाईक व सूरज गावडे यांच्या पथकाने आज ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी, की पत्रादेवीमार्गे पुणे येथे जाणारा कंटेनर (एमएच 04 जेयू 2243) पत्रादेवी चेकनाक्‍यावर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी अडविला. यावेळी चालकाने नाक्‍यावरील अधिकाऱ्यांना या कंटेनरमध्ये नेव्हीचे साहित्य असून ते पुण्याला नेत आहे, असे सांगितले. या वेळी त्याने आपल्याकडील नेव्हीच्या नावाचे बनावट पत्रही दिले. त्यात संरक्षण मंत्रालयाच्या नेव्ही विभागाचे महत्त्वाचे सामान असून कोणत्याच चेक नाक्‍यावर अडथळा न करता हे वाहन विनाविलंब प्राधान्य क्रमाने सोडवे, कोणताही अडथळा न आणता तपासणी शिवाय सोडावे, या वाहनाची व सामानाची सर्व कागदपत्रे आमच्या कस्टडीत आहेत, असा उल्लेख करणारे पत्र चालकाने चेकनाक्‍यावर सादर केले. 

अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहनाचा संशय आला. त्यांनी कंटेनर तपासल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. अधिकारी कंटेनर तपासणीसाठी गेल्याची संधी साधून चालकाने जंगलात धूम ठोकली. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात 40 हून अधिक बिअर आणि रमचे बॉक्‍स आढळले. त्याची बाजारभावाप्रमाणे 9 लाख रुपये किंमत होते. दारू वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे 11 लाख रुपयांचा कंटेनर, असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine lakh rupice liquor seized at banda konkan sindhudurg