''नवाब मलिक पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर''

नवाब मलिक पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
नवाब मलिक पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरGoogle

सिंधुदुर्ग: राज्‍याचे अल्‍पसंख्यांक मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे (Pakistan) ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आहेत. पाकिस्तानमधून येणारा ड्रग्‍ज मुंबई आणि संपूर्ण महाराष्‍ट्रात व्यवस्थितपणे पसरला पाहिजे यासाठी ते काम करत आहेत. अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे ( Nitesh Rane)यांनी आज केली. तसेच मराठी माणूस असलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना चिरडण्याची भाषा ते करत आहेत. तरीही शिवसेनेचे सगळे नेते गप्प असून आता शिवसेनेची मराठी अस्मिता गेली कुठे? असा सवालही राणे यांनी केला. येथील प्रहार भवन येथे राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्‍हणाले, अल्‍पसंख्यांक मंत्री हे पाकिस्तानचे ड्रग्‍ज माफिया आहेत. त्‍यांच्यामुळे भविष्यातील पिढी खराब होणार आहे. त्‍यामुळेच एनसीबीने ड्रग्‍ज माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पण नवाब मलीक हे एनसीबीला बदनाम करत आहेत. ड्रग्‍ज माफियांची हिंमत वाढविण्याचे काम करत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना समीर वानखेडे यांना टार्गेट केलं जातंय. यावर एकही शिवसेनेचा नेता बोलत नाही. ही दुदैवाची बाब असून आता शिवसेनेची मराठी अस्मिता कुठे गेली असा आमचा सवाल आहे.

राणे म्‍हणाले, मराठी माणसांची संघटना असे सांगताना शिवसेनेला लाज वाटायला पाहिजे. नवाब मलीक रोज मराठी माणसाला बदनाम करतोय. समीर वानखेडे यांची पत्‍नी क्रांती रेडकर ही मराठी अभिनेत्री आहे हे देखील शिवसेनेला दिसत नाही का? यावर शिवसेना काही बोलणार नाही का? आता खरं तर संजय राऊत यांनी हिंदूत्‍व, मराठी अस्मिता यावर नवाब मलीक यांना धडे द्यायला हवेत.

ते म्‍हणाले, राज्‍यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. पण मुंबईत ‘गर्व से कहा हम हिंदु है’ असं म्‍हणण्यावर बंदी आलीय. मालवणी भागात फक्‍त ‘गर्व से कहो..’ असे फलक लावले म्‍हणून तेथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. मुंबईत स्वत: हिंदू म्‍हणवून घेणं पाप झालं आहे.

हर्बल शेतीची माहिती कोकणातील शेतकऱ्यांनाही द्या

नवाब मलिकांच्या घरी गांजा सापडला नव्हता तर डब्‍यात हर्बल सापडला होता असा दावा शरद पवार करत आहेत. आता या हर्बलबाबतची थोडी माहिती आमच्या कोकणातील शेतकऱ्यांनाही द्यावी. जेणेकरून उद्या हर्बलचे पीक आले तर ते विकत घ्यायला नवाब मलीक आहेतच. तसेच मलीक यांचा जावई घरामध्ये दोनशे, तिनशे हर्बलचा स्टॉक करून ठेवतो. त्‍यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला हर्बलचा सगळा माल नवाब मलिक यांच्या जावयाने विकत घ्यावा अशी आमची मागणी आहे असेही राणे म्‍हणाले.

शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार

राज्‍य सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. अतिवृष्‍टी तसेच अवकाळी पावसामुळे राज्‍यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण शासनाकडून रूपयाचीही मदत देण्यात आलेली नाही अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केली. यावेळी त्‍यांच्यासोबत माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

नवाब मलिक पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
कोकण रेल्वेचे तिकीट महागच: थाळ्या वाजवा म्हणणारे गप्प का? राऊळ

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली

राणे म्‍हणाले, राज्यातील ५१ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही. तर ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे.

मातोश्री वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार

ते म्‍हणाले, राज्‍य शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबाची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे.

ठाकरे सरकार मूग गिळून गप्प

ते म्‍हणाले, सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले असताना, या पिकाच्या मोठ्या उत्पन्नाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. भेसळयुक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच नागविला असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यावर मात्र ठाकरे सरकार मूग गिळून गप्प आहे.

पंचवीस हजार नुकसानभरपाई आश्वासनाचे काय झाले?

विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या पंचवीस हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्या घोषणेचे काय झाले? तसेच ५० हजार एनपीए देण्याची नागपूर विधानसभेत घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंना क्या हुआ तेरा वादा? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्‍याचे राणे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com