महिन्यापूर्वी  केलेला नितेश राणेंचा दावा ठरला खरा: संजय राऊत यांच्या पत्नीला आली ईडीची नोटीस

nitesh rane Months ago Claim Truth  ED notice to Sanjay Rauts wife
nitesh rane Months ago Claim Truth ED notice to Sanjay Rauts wife

रत्नागिरी : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या घरातील एका सदस्याला सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मागील महिन्यात केला होता. तो दावा खरा ठरला असून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.


काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी मोठा दावा केला होता. संजय राऊत यांच्या घरातील सदस्यालाही ईडीची नोटीस आल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगत राणेंनी मोठी खळबळ उडवून दिली होती. राणेंनी केलेला दावा खरा असल्याचे अखेर समोर आले आहे. महाआघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जात असल्याचा आरोप होत आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरे की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. 

आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि पुणेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली होती. परकी चलनाविषयीच्या फेमा कायद्यांअंतर्गत विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकून  सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ईडीच्या  कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी  नोटीस बजावली होती. यावरुन शिवसेना नेते भाजपवर चांगलेच संतापले होते. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com