ढिसाळ कारभाराचा नमुना, पालिकेकडे वृक्षगणनेची नोंदच नाही 

प्रशांत हिंदळेकर
Wednesday, 9 September 2020

पालिका क्षेत्रातील झाडांची नोंद ही पालिकेकडे असायलाच हवी तरच किती झाडांची तोड झाली व किती झाडे नव्याने लावली? याचीही माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरातील वृक्ष गणना अद्याप झालीच नाही त्यामुळे शहरात किती झाडे आहेत?, किती झाडांची तोड झाली?, किती झाडांची नव्याने लागवड झाली? याबाबत पालिका प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज झालेल्या बैठकीत दिली. 

पालिका क्षेत्रातील झाडांची नोंद ही पालिकेकडे असायलाच हवी तरच किती झाडांची तोड झाली व किती झाडे नव्याने लावली? याचीही माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी शहरातील वृक्ष गणना करण्याची कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल, पालिकेच्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. 
पालिका वृक्ष प्राधिकरण समितीची ऑनलाईन बैठक आज झाली.

तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत वृक्ष लागवड व वृक्ष वाढ या विषयावर सर्वच सदस्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली. पालिका हद्दीत नव्याने उभारणी होत असलेल्या अग्निशमन इमारत ठिकाणी असलेली 5 झाडे तोडण्यासाठी व त्या बदल्यात अन्य ठिकाणी झाडे लावण्याबाबत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मुख्याधिकारी जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक गणेश कुशे, नितीन वाळके, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, वदन कुडाळकर, गणेश कुडाळकर, संजय गोवेकर, अमित खोत, महेश कदम आदी सदस्य उपस्थित होते. 

कोळंब-देऊळवाडा सागरी महामार्ग रस्ता दुतर्फा तसेच बोर्डिंग मैदान, सिंधुदुर्ग महाविद्यालय परिसरात त्या त्या प्रशासनाच्या परवानगीने पालिकेने झाडे लावावीत. याबाबत नितीन वाळके, गणेश कुशे यासह अन्य सदस्यांनी सूचना केली. शहरात काही खासगी मालमत्तेत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आल्याचे श्री. वाळके यांनी सांगितले. यावर चौकशी करून कार्यवाही केली जाईल, शहरात अशा स्वरूपात झाडे तोड झाली असेल तर त्याचेही सर्वेक्षण होईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. पालिका परवानगीशिवाय झाडे तोडल्यास फौजदारी स्वरूपात तसेच दंडात्मक कारवाईचे अधिकार पालिकेला असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या, आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंब झाड अत्यंत महत्त्वाचे आहे. 

काही सूचना 
शहरातील उपलब्ध जागेनुसार कडुलिंब, बदाम या झाडांची लागवड करावी, त्याबरोबर उंडल हे झाड खार जमिनीतही वाढते, परागीकरण प्रक्रियेत या झाडाचे महत्त्व आहे. बर्ड चेरी या झाडाच्या लागवडीतून पक्षांना फळे मिळतील. त्यामुळे या झाडांचा वृक्ष लागवडीसाठी अधिक विचार व्हावा, अशी सूचना वृक्ष अभ्यासक संजय गोवेकर यांनी मांडली. त्यावरही सर्वांनी सकारात्मक तयारी दर्शवली. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या सी-ईगल पक्षांचा अधिवास वाढण्याच्या दृष्टीने इरई झाडांची लागवड किनारपट्टीवरील शासकीय अथवा निमशासकीय जागेत झाल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी सूचना पक्षीमित्र चंद्रवदन कुडाळकर यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no record of tree counting malvan municipality