४८ तासांत भरा साडेनऊ लाख ; महावितरणने दिली नोटीस

the notice of MSEDCL notice to a builder in chiplun ratnagiri 9 lakh rupees paid within 48 hours
the notice of MSEDCL notice to a builder in chiplun ratnagiri 9 lakh rupees paid within 48 hours

चिपळूण : शहरात उक्ताड येथे झालेल्या वीजचोरी प्रकरणी महावितरणने ९ लाख ५३ हजार रुपये भरण्याची नोटीस संबंधित बिल्डरला बजावली आहे. ४८ तासांत ही रक्कम आदा केली नाही तर थेट गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती चिपळूण महावितरणचे उपअभियंता गोविंद भोयने यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यास न्यायालयाच्या निकालाशिवाय संबंधित बिल्डरला वीज कनेक्‍शन देता येणार नाही, असेही भोयने यांनी स्पष्ट केले.

शहरातील उक्ताड येथे मरियम अपार्टमेंटमध्ये शनिवारी वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. येथील रहिवाशांनीच त्याबाबत तक्रार केली होती. कनिष्ठ अभियंता मदने यांनी पाहणी केली असता, येथील तब्बल १४ सदनिका आणि ४ दुकानगाळ्यांना बेकायदेशीरपणे हा वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास येताच पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली होती. हा वीजपुरवठा कधीपासून सुरू होता, किती वीज चोरी झाली, याबाबत तातडीने चौकशी सुरू केली होती.

महावितरणकडून आता हा संपूर्ण अहवाल तयार केला आहे. सुमारे ८ लाख ३३ हजार ९४ रुपयांची वीज चोरी असून त्यावर १ लाख २० हजार इतकी तडजोडीची रक्कम आकारली आहे. असे एकूण ९ लाख ५६ हजार रुपये ४८ तासात भरण्याची नोटीस संबंधित बिल्डरला दिली, अशी माहिती उप अभियंता गोविंद भोयने यांनी दिली. ही रक्कम मुदतीत भरली नाही तर मात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तज्ज्ञ व्यक्ती असण्याची देखील शक्‍यता

ही वीजचोरी कधीपासून सुरू होती, याचा अंदाज काढून ते सिद्ध करणे अशक्‍य आहे; परंतु संबंधित बिल्डरचे एक मीटर ६ महिन्यांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून ही वीजचोरी सुरू असावी, असा अंदाज काढला आहे. तसेच यामध्ये कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती असण्याची देखील शक्‍यता आहे. मात्र, त्याला बिल्डरच जबाबदार आहे. बिल्डरने सांगितल्याशिवाय कोणीही तज्ज्ञ व्यक्ती परस्पर असे कृत्य करू शकत नाही. जर गुन्हा दाखल झाला तर त्याची देखील चौकशी पोलिस करतील, अशी माहितीही भोयने यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com