'ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची तयारी पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

इमानदारीने समाजात काम करण्याचा संकल्प रत्नागिरीत आयोजित कुणबी समाजातील नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. 

रत्नागिरी - ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची तयारी कुणबी समाज बांधवांनी केली पाहिजे. कुणबी सजातील कष्टकरी लोकांना सत्तेपासून नेहमीच दूर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी इमानदारीने समाजात काम करण्याचा संकल्प रत्नागिरीत आयोजित कुणबी समाजातील नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. 

कुणबी समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी सामाजिक समस्यांची व्याप्ती समजून घेण्याच्या उद्देशाने प्रखर लढा उभारण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत जे. के. फाईल्स येथे सहविचार समन्वय बैठक झाली. 

यावेळी शरदचंद्र गीते, नंदकुमार मोहिते, आत्माराम धुमक, अशोक वालम, अविनाश लाड, सुरेश भायजे, संतोष थेराडे, कृष्णा हरेकर, नारायण भुरवणे, वसंत घडशी, अनिल चौगुले, शंकर भुवड, शशिकांत वाघे, अ‍ॅड. नीता डाफळे, नंदिनी तांबे, रावणंग आदी रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी मार्गदर्शन करताना नंदू मोहिते म्हणाले की, कुणबी समाजाचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी एकत्र आलो आहोत. यानिमित्ताने इमानदार समाज घडवण्याचा संकल्प करु या. आतापर्यंत शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ यासारख्या कमिट्या नावापुर्त्याच आहेत. आतापर्यंत सर्वांनीच कष्टकरी जनतेला सत्तेपासून वंचित ठेवले. आहे. त्यासाठी इमानदारीने समाजात काम करण्याची हीच वेळ आहे. 

अशोक वालम म्हणाले, आंदोलने, पत्रव्यवहार करुन काहीच साध्य होणार नाही. खरोखर अधिकार मिळवायचे असतील, तर मराठा समाजाला आरक्षणात घुसू द्यायचे नाही. ओबीसी आरक्षण टिकावयाचे असेल तर वेळ पडल्यास डोक्याला कफन बांधून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहीजे. तरच समाजाची दखल घेतली जाईल. त्यानुसार जिल्ह्याची बांधणी करायला हवी. तसेच संतोष थेराडे म्हणाले, मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीत ढवळाढवळ नको. आतापर्यंत कुणबी समाजाने संयम बाळगला आहे. नेहमीच होणारा अन्याय आता सहन करणार नाही. कुणबी समाज आतापर्यंत सर्व भोगतोय. समाजाचे ऐकले नाही तर सगळा समाज रस्त्यावर उतरेल. आम्ही समजंस आहोत, आमची सहनशिलता पाहू नये.

हे पण वाचाकंगणाचा पाय खोलात ; एफआयआर दाखल करून घेण्याचे न्यायालयाचे निर्देश 

दरम्यान, कुणबी समाज एकत्र आणण्यासाठी जिल्ह्याची बांधणी करण्याच्या उद्देशाने कार्यकारीणी तयार केली जाणार आहे. त्यासाठी पहिली सभा आज रत्नागिरीत झाली. उद्या (ता. 11) खेडला चार तालुक्यांची सभा होईल. त्यानंत कोअर कमिटी तयार करण्यात येणार आहे.  भविष्यात तालुकानिहाय बैठका घेऊन बांधणी केली जाईल.

तर जिल्हा विरोधात उभा करु

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आहे. भविष्यात कोणीही अध्यादेश काढला तर पूर्ण जिल्हा त्या विरोधात उभा करु, असा इशारा बैठकीत बोलताना अशोक वालम यांनी दिला. 15 ला मंत्रालयात रिफायनरीविषयीचे पडसाद उमटतील असेही वालम यांनी स्पष्ट केले.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obc community leaders meeting in ratnagiri