दाभोळ खाडीतील चिनी बोटींवर पोचण्यात अडथळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना या बोटींपर्यंत जाता आले नाही. 

दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना या बोटींपर्यंत जाता आले नाही. 

आश्रयाच्या प्रस्तावावर सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या बोटींची सखोल चौकशी करूनच त्यांना देशाच्या सागरी हद्‌दीत प्रवेश देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अंजनवेल येथील आरजीपीपीएल येथे या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यात समुद्रातील वादळी स्थितीमुळे चीनच्या ८ मच्छीमार नौकांनी दाभोळ बंदरात आश्रय मागितल्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भारतीय तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.

या बोटींची सखोल चौकशी व तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तटरक्षक दल, पोलिस व सीमाशुल्क विभागाच्या संयुक्त पथकाकडून प्रत्येक बोटीची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतरच बोटींना आश्रय देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.  

दाभोळजवळील समुद्रात सहा दिवसांपूर्वी चीनच्या २ मच्छीमार बोटींनी घुसखोरी केली होती, त्यात आणखी ८ चीनी नौका आढळल्याने खळबळ उडाली होती. यातील दोन नौकांच्या तपासणीदरम्यान काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यांना दाभोळ खाडीत नौका उभ्या करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्या पाठोपाठ आणखी ८ नौका किनाऱ्यावर आढळल्याने उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. पोलिस, तटरक्षक दल आणि सीमाशुल्क विभाग या तिन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक या बोटींची सखोल तपासणी करणार आहे.

या आठही चिनी मच्छीमारी बोटींची कागदपत्र या बोटीच्या एजंटने सीमाशुल्क विभाग व दाभोळ येथील बंदर विभागाच्या कार्यालयात सादर केली असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.

तपासणी पुढील दोन दिवसांत पूर्ण
प्रत्येक बोटीवर स्वतंत्रपणे जाऊन विविध निकषांवर कागदपत्रांसह अन्य गोष्टींची चौकशी व तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आश्रय देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstacles to reaching the Chinese boats in Dabhol Bay