सावंतवाडी पालिकेला मिळणार अडीच कोटी, पण कशासाठी?

 ODF status to Sawantwadi
ODF status to Sawantwadi

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील शहरास स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओडीएफ (++) दर्जा प्राप्त झाला असून सावंतवाडी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे आता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मानांकन प्राप्त केल्याबद्दल उर्वरित पारितोषिकाची अडीच कोटींची रक्कम येथील पालिकेला मिळणार आहे. या मानांकनात सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, अधिकारी आणि शहरवासीयांचे अथक प्रयत्न असल्याचे सांगून या सर्वांचे अभिनंदन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. 

येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते. यावेळी सभापती नासीर शेख, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, ""पालिका हद्दीतली सार्वजनिक कोणतीही 10 स्वच्छतागृहे व शौचालये ही योग्य नीटनेटकी आणि स्वच्छतेने परिपूर्ण असावी लागतात. अशा पालिकांना ओडीएफ (++) हा दर्जा देण्यात येतो. केंद्राचे स्वच्छ भारत अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट शहर हागणदारीमुक्त करणे, सार्वजनिक शौचालयांचा दर्जा सुधारणे, निर्माण होणाऱ्या मैल्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे या गोष्टी महत्वाच्या होत्या. याअंतर्गत शहरात क्वॉलिटी कौन्सिल औफ इंडिया यांच्या मार्फत शहराची तपासणी 1 ते 31 जानेवारी या कालावधीत करण्यात आली होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत क्रमवारी प्राप्त होन्याकरिता शहर ओडीएफ (++) होणे अत्यंत आवश्‍यक होते. काही निकषांची पुर्तता करताना शहरातील 95 टक्केहून अधिक मालमत्तांना शौचालयांची सुविधा देण्यात आली. शिवाय ही शौचालये ही सेप्टीक टॅकला जोडण्यात आली. सेप्टीक टॅकमधून मैला उपसण्यसाठी मैलावाहक वाहन ठेवण्यात आली होती. मैल्याची सुरक्षित विल्हेवाटही लावण्यात आली. अशी सर्व निकषांची पूर्तता सावंतवाडी शहरामार्फत करण्यात आली होती. त्यामुळे सावंतवाडी शहरास हा दर्जा प्राप्त झाला.'' 

मुख्याधिकारी जिरगे म्हणाले, ""शहरास 2018 मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये चांगल्या कामगिरीबद्दल एकूण 5 कोटी रुपये एवढे बक्षिस जाहीर झाले होते. त्यापैकी रक्कम 2.50 कोटी रुपये प्रोत्साहनपतर अनुदान प्राप्त झाले होते. उर्वरित रक्कम 2.50 कोटी अनुदान प्राप्त होण्याकरिता शहर ओडीएफ (++) होणे, तीन तारांकित मानांकन प्राप्त होणे आणि राष्ट्रीय पातळीवर 50 चे आत मानांकन प्राप्त होणे आवश्‍यक आहे. त्यातील पहिला टप्पा ओडीएफ (++) होणे हा होता. पालिकेने आज हा टप्पा पूर्ण केलेला आहे.'' 

शहर ओडीएफ (++) होण्याकरिता शहरातील नागरिकांचे, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, शाळा, मंडळे आदीचे मोलाचे सहकार्य लाभले. याकरिता पालिकेतील अधिकारी-कर्मचारी व सफाई कामगार यांचेदेखील सहकार्य लाभले. हा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य व क्रीडा सभापती ऍड. परीमल नाईक, पाणीपुरवठा सभापती नासिर शेख तसेच सर्व नगरसेवक यांचे मुख्यअधिकारी जिरगे यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. 

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रभाव असल्याने चिकनच्या विक्रीमध्ये आणि आणि दरांमध्येही मोठी घट झालेली असतानाही मोठ्या शहरांत कमी दराने चिकन मिळत आहे. दर दिवशी चिकनचा दर बदलत असताना सावंतवाडी शहरामध्ये 110 रुपये प्रति किलो चिकन तर नेट चिकनचा दर 180 रुपये पूर्वीप्रमाणेच चिकनचे दर असल्याबाबत विचारले असता हे दर निश्‍चित करण्याबाबत काहीही करू शकत नसल्याचे मुख्याधिकारी जिरगे यांनी सांगितले. यावर कोल्हापूर येथे मटन दर कसे काय निश्‍चित केले असे विचारले असता त्यानी यासाठी न्यायालयाकडून आदेश दिल्याचे सांगितले. 

"रामेश्‍वर'मधील गाळेधारकांना नोटीस 
यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांना रामेश्‍वर प्लाझा येथील अतिक्रमणे हटवणार काय असा सवाल केला असता याबाबतची नोटीस दिली असल्याचे त्यांनी सांगितले. रामेश्‍वर प्लाझा येथील व्यापारी संकुलासाठी बेस्ट टॉयलेटची सुविधा नसल्या बाबतच्या सूचनांचा विचार करणार असल्याचे मुख्याधिकारी जिरगे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com