अधिकाऱ्यांची गुप्त शाळाभेट ; शिक्षकांची उडाली धावपळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

मंडणगडात चर्चा; शैक्षणिक उपक्रमांत चालढकल, विद्यार्थ्यांचे नुकसान

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनामुळे लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील शाळांचे विद्यार्जनाचे नैमित्तिक कामकाज सध्या बंद आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता ऑनलाइन शिक्षण पद्धती व गृहपाठ यांचा अवलंब शिक्षण विभागाने केला. याची विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पडताळणी करण्यासाठी एका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच शाळाभेटीचा गुप्त कार्यक्रम ठरविला. याची कुणकूण लागताच अनेक शिक्षकांच्या गाड्या आपापल्या शाळांच्या रस्त्याला धावताना पाहून तारांबळ उडाल्याची चर्चा चांगलीच रंगली.

हेही वाचा - बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती 

मंडणगडसारख्या डोंगराळ तालुक्‍यात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांच्या अभावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी येताहेत. ग्रामीण भागात इंटरनेट व मोबाईल रेंजच्या अभावामुळे या समस्येवर तत्कालीन उपाययोजना म्हणून आठवड्यातील दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रशालेत बोलावून सर्व नियमांचे पालन करीत गृहपाठ देऊन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याच्या दृष्टीने तालुक्‍यात पावले उचलण्यात आली आहेत; मात्र तालुक्‍यातील अनेक शाळांवरील शिक्षक आजही लॉकडाउनमुळे शाळा बंद व सुटीच्या निमित्ताने बाहेर असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 

हेही वाचा - मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का 

बदलत्या परिस्थितीत शैक्षणिक कामकाजात खंड न पडण्यासाठी तालुक्‍यातील सर्व केंद्रांवर अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित शिक्षकांनी बैठका घेऊन नजीकच्या काळातील कामाचे नियोजन केले आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे आश्‍वस्तही केले आहे; मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. शिक्षकांनीच केलेले नियोजनबरहुकूम, त्याची अंमलबजावणी मोजके शिक्षक वगळता अजिबात होत नसल्याचे शिक्षण विभागाच्याच निदर्शनास आल्याने त्याची पडताळणी करण्यासाठी तालुक्‍यातील शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळाभेटीचा उपक्रम नुकताच हाती घेतला. या अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची माहिती तालुक्‍यात हजर असूनही शाळेत न जाणाऱ्या शिक्षकांना लागल्याने प्रचंड धावपळ करत प्रत्येकाने आपापली शाळा गाठत, अधिकाऱ्यांच्या आधी उपस्थित राहून आम्ही कार्यमग्न असल्याचे दाखविण्यात आले.

दृष्टिक्षेपात

- इंटरनेट व मोबाईल रेंजच्या अभावावर उपाय
- आठवड्यातील दोन दिवस प्रशालेत गृहपाठ
- कामावर गैरहजर शिक्षकांची संख्या लक्षणीय 
- सहकारी शिक्षकांच्या खांद्यावर बंदूक 
- अनेक शिक्षक सध्या झाले नॉट रिचेबल

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers meet schools and teachers are not in school in ratnagiri