
शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यांना सांगून इमारतींचे ऑडिट मोफत करून घ्यावे, अशा सूचना देऊन सामंत पुढे म्हणाले, ""पाच नगरपंचायतींना आणि ओरोस प्राधिकरणासाठी मिनी अग्निशमन यंत्रणा देण्यात यावी.
कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 30 वर्षे जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोरोना व लसीकरणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यांना सांगून इमारतींचे ऑडिट मोफत करून घ्यावे, अशा सूचना देऊन सामंत पुढे म्हणाले, ""पाच नगरपंचायतींना आणि ओरोस प्राधिकरणासाठी मिनी अग्निशमन यंत्रणा देण्यात यावी. प्रत्येक मतदारसंघाला विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी द्या. चिपी विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज आहे. विमानाचे उड्डाण म्हणजे जिल्ह्याच्या विकासाचे उड्डाण आहे. त्यामुळे कोणीही श्रेयवाद न करता एकत्र येऊन स्वागत करावे. विमानतळासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी दिला आहे. लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ता. 13 ला डिजीसीआयचे पथक पाहणीसाठी येणार आहे.
मी, ता. 17 ला विमानतळाची पाहणी करणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय व लसीकरणासाठी नवीन इमारत उभारली आहे. पाडगांवकराच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यासाठी दीड कोटींची तरतूद आहे. ता. 17 ला विकासकामांसदर्भात बैठक घेऊ. त्यावेळी जिल्हा मुख्यालयामध्ये ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व मुख्यालयामध्ये 30 मीटर उंचीचा तिरंगा उभारण्याविषयीही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत.''
जिल्ह्यातील 20 मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये व्यायामशाळा उभारावी, कचरा उचलण्यासाठी त्यांना घंटागाडी देण्यात यावी, पोलिस विभागाला एस्कॉर्टिंगसाठी 5 गाड्या द्याव्यात, आंबोली येथील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 52 लाखांचा निधी द्यावा. हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीतून करावा, अशी सूचनाही पालमंत्र्यांनी दिल्या.
सामंत यांनी बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लसीकरण यासाठीच्या तयारीची पाहणी केली.
दररोज 600 जणांना लस
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी सर्व ती यंत्रणा तयार ठेवावी, असे सांगून सामंत म्हणाले, ""पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील 9434 डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही समावेश आहे. काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अजून नोंदणी केली नसल्याने हा आकडा वाढू शकतो.
दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिस व नंतर प्रशासन आणि 50 वर्षावरील नागरिक तसेच इतर आजार असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय, ओरोस, सावंतवाडी, कणकवली आणि शिरोडा उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले व मालवण ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी दिवसाला 100 जणांचे लसीकरण याप्रमाणे दिवसात 600 जणांचे लसीकरण होईल.''
संपादन - राहुल पाटील