ऑलिव्ह रिडलेची अरबी समुद्रातच वस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arabian Sea

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाचपैकी वनश्री हे एकमेव कासव संपर्कात आहे.

ऑलिव्ह रिडलेची अरबी समुद्रातच वस्ती

रत्नागिरी - ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाचपैकी वनश्री हे एकमेव कासव संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी रेवाचा संपर्क तुटला. संपर्काबाहेर गेलेले रेवा हे चौथे कासव ठरले. मागील सहा महिन्यातील निरीक्षणांवरून या कासवांचे कायम वास्तव्य हे अरबी समुद्रातील असावे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच ती अति खोल समुद्रात प्रवास करत जात नसावीत, या अंदाजाला यालाही पुष्टी मिळाल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनाऱ्‍यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कोठून येतात, याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर येथील किनार्‍यांवरून सॅटेलाइट टॅगिंग करून पाच कासवे समुद्रात सोडण्यात आली. त्यांच्या नोंदीही घेतल्या जात आहेत. काही कालावधीतच लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रथमा आणि सावनी संपर्काबाहेर गेली. प्रथमाने गुजरातच्या किनाऱ्‍यापर्यंत प्रवास केला होता. पावसाळा तोंडावर आल्यानंतर सर्वच कासवांचा प्रवास दक्षिण किनाऱ्‍याकडे सुरू झाला होता. जून महिन्याच्या अखेरीस रेवाचा संपर्क तुटला. ते १५ फेब्रुवारीला गुहागर येथून टॅग करून सोडण्यात आले होते. ट्रान्समीटरमधील बिघाडामुळेच ती संपर्काबाहेर गेल्याचे अभ्यासकांचे मत आहे. रेवाने २ हजार ३२८ किलोमीटर अंतर कापले असून ते कारवार, कर्नाटकच्या किनाऱ्‍यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर डुबकी मारत होते. ही रेवाची शेवटची नोंद होती. याला कांदळवन कक्षाकडूनही दुजोरा मिळाला आहे.

सध्या वनश्री हे एकमेव कासव संपर्कात असून ते मालवण किनाऱ्‍यापासून काही अंतरावर समुद्रात डुबकी घेत आहे. पाचपैकी चार कासवांचा संपर्क तुटला असला तरीही अभ्यासकांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. ऑलिव्ह रिडले ही अरबी समुद्रातच वास्तव्य करणारी आहेत. प्रथमा कासव गुजरातच्या दिशेने पुढे गेले होते; मात्र ते पुन्हा दक्षिणेकडे येऊ लागले. ती किनाऱ्‍यापासून खोल समुद्रात ६० ते ९० किलोमीटर अंतरापर्यंतच प्रवास करत गेली होती. त्यानंतर ती पुन्हा किनाऱ्‍याकडे परतली. यावरून ती अतिखोल समुद्रात जात नसून खंडीय भागातच त्यांना राहण्याची सवय आहे. संपर्कात असलेल्या वनश्रीमुळे पावसाळ्यानंतर पुढील प्रवासाच्या नोंदी घेणे शक्य होईल. त्यामुळे अभ्यासकांची उत्सुकता वाढली आहे. पाचमधील सावनी कासवाने एकाच महिन्यात दोनवेळा अंडी घातली होती. यावरून एकदा अंडी घातल्यानंतर ती पुन्हा अंडी घालू शकतात, असा निष्कर्ष नोंदला गेला.

ऑलिव्ह रिडलेचा प्रवास कसा होतो, यावर नजर ठेवण्यासाठी सॅटेलाईट टॅग केलेली कासवं सोडली होती. सहा महिन्यातील निरीक्षणावरून काही आडाखेही बांधले गेले आहेत. सध्या एकच कासव संपर्कात आहे.

- डॉ. सुरेश कुमार, अभ्यासक, वनविभाग

एक नजर..

* चार कासवांचा संपर्क तुटला

* वनश्रीच्या संपर्कामुळे अभ्यास सुरू

* पुन्हा अंडी कुठे घालणार हे कळणार

* दुसऱ्‍या टप्प्यात कासवं सोडण्याची तयारी