पुलावरून सायकलने जाताना तोल गेला अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोवा - बांबुळी येथे हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यानंतर गायकवाड यांना अधिक उपचारासाठी गोवा - बांबुळी येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सायकलवरून जाताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या पुलावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा गोवा - बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश दत्ताराम गायकवाड (वय 47 रा. बिद्री, कागल जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. 

गायकवाड हे आज सकाळी 7 च्या सुमारास खानोलकर मंगल कार्यालयाच्या समोरून सायकलवरून जात होते. ते जरा पुढे गेल्यावर त्यांचा तोल अचानक गेला आणि एका छोट्याशा असलेल्या पुलाखाली ते कोसळले यात त्यांच्या डोक्‍याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली. तेथून ये - जा करणाऱ्या वाहन धारकांनी या घटनेची माहिती माजी पंचायत समिती सभापती राजू परब यांना दिली. यानंतर त्यांना तात्काळ गाडीत घालून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोवा - बांबुळी येथे हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यानंतर गायकवाड यांना अधिक उपचारासाठी गोवा - बांबुळी येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

गायकवाड हे मळगाव येथे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राहावयास होते. कामानिमित्त ते आपल्या कुटुंबियांपासून मळगाव येथे अलिप्त होते. अलीकडेच मळगाव येथे लाईटचे पोल उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. आज सकाळी ते सायकलवरून जात असताना ही घटना घडली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Dead In An Accident On Bridge In Savantwadi