
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी : आर्थिक अडचणीत असताना घेतलेल्या २५ लाख कर्जाची परतफेड करताना ५५ लाख रुपये देऊनही अधिक रक्कम हवी म्हणून रत्नागिरीत राहणाऱ्या एकाचे पुण्यातील सहा संशयितांनी अपहरण केले. संगमेश्वर, हातखंबा, पाली रस्त्यावर फिरवून तिथे त्याला धक्काबुक्की करून २० लाखांची मोटार व १० हजार रुपये घेऊन पलायन केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामचंद्र शेडगे (रा. भोर जि. पुणे )व अन्य पाचजण मास्क परिधान केलेले, वय वर्ष तीस ते चाळीस (नाव, गाव, माहीत नाही) असे संशयित आहेत. ही घटना ३० ऑक्टोबरला मजगाव रोड, हातखंबा, पाली, संगमेश्वर या ठिकाणी घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष विश्वानाथ जगदाळे (वय ४०, रा. गोपगाव ता. पुरंदर, जि. पुणे. सध्या शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी संशयित गणेश रामचंद्र शेडगे (रा. भोर, जि. पुणे) यांच्याकडून २०१८ ला आर्थिक अडचण असल्यामुळे २५ लाख रुपये सावकारी व्याजाने घेतले होते. त्यानंतर जगदाळे यांनी ५५ लाख देऊन सावकारी कर्जाची परतफेड केली होती.
हेही वाचा - कोकणात आहे ३५० वर्षे जुने व पारंपरिक घर जे ठरतेय चित्रीकरणाचे डेस्टिनेशन -
३० ऑक्टोबरला त्याचा मोटार चालक समीर ठाकूर याला सकाळी साडेनऊच्या सुमारास मजगाव रोड येथील हॉटेल येथे पैसे देण्यासाठी गेले. त्यावेळी शेडगेसह अन्य पाच संशयित मोटारीतून आले. जगदाळे यांचे तोंड दाबून त्यांना जगदाळे यांच्याच मोटारीत बसवले. त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी केली. पैसे नाहीत सांगितल्यावर जगदाळे यांच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. त्यानंतर चालकाला गाडी जे. के. फाईल्स येथे वळवायला सांगून पाली येथे नेले. तेथे जबरदस्तीने जगदाळे यांच्याकडून १० हजार रुपये काढून घेतले.
पालीहून परत डिझेल भरण्यासाठी हातखंबा येथे आले. संगमेश्वर रस्त्यावर नेऊन जगदाळे यांना धक्काबुकी केली. जगदाळे यांनी पाय दुखत असल्याचे सांगितल्यावर सकाळी साडे अकराच्या सुमारास मारुती मंदिर येथील हॉस्पिटलला सोडले. जगदाळेंची २० लाखाची मोटार घेऊन पलायन केले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. जगदाळे यांनी काल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अनिल लाड करत आहेत.
हेही वाचा - गणपतीपुळे फुलले; श्रींच्या दर्शनाला मांदियाळी भाविक आले अन् -
दृष्टिक्षेपात
- पुण्यातील सहा जणांविरोधात गुन्हा
- ३० ऑक्टोबरला सावकारीतून धक्काबुक्की
- पाली, हातखंबा, संगमेश्वरला फिरवले
- संशयितानी घातला होता मास्क
संपादन - स्नेहल कदम