भरपावसात उपोषण; अनेकांचा पाठिंबा! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

राजेश सरकारे
Thursday, 6 August 2020

हायवेच्या कामाच्या दर्जाची पाहणी होऊन दुरूस्तीची कार्यवाही व्हावी आदी मागण्या मांजरेकर यांनी केल्या. या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली तालुका कॉंग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. महामार्ग चौपदरीकरणाचा रखडलेला मोबदला मिळावा. महामार्ग कामाच्या दर्जाची तपासणी व्हावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. त्यांच्या उपोषणाला आज अनेकांनी पाठिंबा दिला. 

महामार्ग चौपदरीकरणातील अनेक प्रकल्पबाधितांचा मोबदला लवादाकडे प्रलंबित आहे. त्या सर्व दाव्यांचा निकाल तातडीने द्यावा. ज्या प्रकल्पबाधितांना लवादाकडून भरपाई मंजूर झाली. त्यांची कार्यवाही तातडीने व्हावी. तर ज्या केसेस जिल्हा कोर्टामध्ये वर्ग आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र कोर्ट नेमावे. हायवेच्या कामाच्या दर्जाची पाहणी होऊन दुरूस्तीची कार्यवाही व्हावी आदी मागण्या मांजरेकर यांनी केल्या. या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला. 

दरम्यान, आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि तहसीलदार आर.जे.पवार यांनी उपोषणकर्ते मांजरेकर यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही होईल, अशी ग्वाही दिली. मात्र ठोस आश्‍वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे मांजरेकर यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person fasting at Kankavali konkan sindhudurg