दिलासादायक ! चिपळुणात 1 हजार 785 रुग्णांची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

चिपळूण तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. शहरात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. तालुक्‍यात पहिला रुग्ण 30 एप्रिलला सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच 4 ऑक्‍टोबरपर्यंत 2138 कोरोनाबाधित रुग्ण सापडले.

चिपळूण ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात कोरोनामुक्तीची सरासरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अद्यापपर्यंतच्या एकूण 2138 रुग्णांपैकी 1785 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्‍क्‍यांवर गेले आहे. तालुक्‍यात 279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाने 74 बळी घेतले आहेत. 

चिपळूण तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. शहरात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. तालुक्‍यात पहिला रुग्ण 30 एप्रिलला सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच 4 ऑक्‍टोबरपर्यंत 2138 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामध्ये 872 रुग्ण चिपळूण शहरातील असून 1266 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

आतापर्यंत एकूण 1785 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यामध्ये 770 शहरी आणि 1015 ग्रामीण रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 83.46 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. त्यामध्ये शहराने बाजी मारली असून शहरात कोरोनामुक्तीचे प्रमाण 88 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे शहरातील 19 रुग्णांचा तर ग्रामीण भागातील 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी सर्वाधिक रुग्ण 55 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. 

गोवळकोटमध्ये आजपासून टेस्टिंग 
गोवळकोट येथे सोमवारपासून (ता. 5)  टेस्टिंग करण्यात येणार आहे. एकूण 50 लोकांचे टेस्टिंग होईल. प्रत्येक इमारतीमधील किमान 5 लोकांचे रक्त तपासले जाईल. या कामी सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Thousand 785 Patients Overcome Corona In Chiplun