पर्यटकांचा आंबोली घाट बनतोय का ? या घटनांसाठी हॉटस्पॉट ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

अनेक घातपात आत्महत्या पोलिसांनी तपासाद्वारे उघडकीस आणल्या आहेत.

सावंतवाडी : मृतदेह टाकण्याचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा आंबोली घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घाटात सापडलेला प्रत्येक मृतदेह पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान घेऊन येतो.  घाटामध्ये पुन्हा एकदा आणखीन एका महिलेचा मृतदेह सापडला असल्याचा प्रकार आज उघड झाला आहे. आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून काही अंतरावरच गोव्यातून सांगलीला जात असताना सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या मुलांना मृतदेहाचा कुजलेला वास आल्याने हा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा - ब्रिटीशकालीन काम अन् आताच्या कामाची होतेय तुलना, कारण...

मृतदेह कोणाचा आहे ? घातपात आहे की आत्महत्या ? याबाबतची माहिती मिळण्यासाठी मृतदेह बाहेर काढण्यासाठी आंबोली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सांगलीतून गोवा येथे परीक्षेला गेलेले दोन विद्यार्थी हे पुन्हा सांगली येथे परतत असताना आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील असलेल्या एका स्पॉटवर सेल्फी काढण्यासाठी थांबले होते.

सेल्फी काढत असताना यावेळी त्यांना मृतदेह कुजण्याचा वास आला. याबाबत त्यांनी परिसरात नीट पाहणी केली असता घाटात 30 ते 40 फूट खाली एक मृतदेह सदृश्य काहीतरी दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी तातडीने आंबोली येथील पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार दत्ता देसाई आणि कॉन्स्टेबल संदीप गावडे यांना दिली. त्यांनी तातडीने हा प्रकार आंबोली रेस्क्यू टीमच्या सदस्यांना सांगितला. 

यानंतर तातडीने घटनास्थळी आंबोली रेस्क्यू टीमचे सदस्य मृतदेह काढण्यासाठी दाखल झाले. हा मृतदेह महिलेचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आंबोली घाट गेली कित्येक वर्षे घातपात केलेले मृतदेह फेकण्यासाठी तसेच आत्महत्या करण्यासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील अनेक मृतदेह संबंधित घटना याठिकाणी घडल्या आहेत.

 

हेही वाचा - कोकणातला मासा सातासमु्द्रापार ; इतक्या कोटीची रोज होतेय उलाढाल

 गेल्याच वर्षी आंबोली घाटात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या पोषाखा वरून ही महिला बेळगाव तसेच राज्याच्या पश्चिमेकडील जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात होते. मात्र या महिलेचा घातपात झाला की आत्महत्या ? ही महिला कोण ? याबद्दल एकवर्ष झाले तरी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. असे कित्येक मृतदेह आंबोलीचा घाट पायथ्याशी वरून दरीत फेकल्याचे तसेच आत्महत्येचे प्रकारही याआधी घडले आहेत.  यातील अनेक घातपात आत्महत्या पोलिसांनी तपासाद्वारे उघडकीस आणल्या आहेत. मात्र कित्येक मृतदेहांची ओळख आणि त्यामागील प्रश्न जैसे थे राहिले आहेत. त्यामुळे आज सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा ? या मृत्यू त्यामागील घटनेची पार्श्वभूमी याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one woman dead body found in amboli ghat near sawantwadi in konkan